प्रतिनिधी, २८ नोव्हेंबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या, २९ नोव्हेंबर रोजी ते सकाळी १० वाजता कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. खडकपाडा येथील स्प्रिंग टाईम क्लबमध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार असल्याची माहिती मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिली आहे.
सध्या राज्यात डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमके काय बोलणार आणि कोणती भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांवर निशाणा साधताना राज ठाकरे यांनी त्यांच्या एका जुन्या भूमिकेची आठवण करून दिली. २ जुलै २०२३ रोजी जेव्हा राष्ट्रवादीचा एक गट फुटून भाजपच्या दिशेने गेला होता, तेव्हाच आपण याबाबत भाष्य केले होते, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पुढील ३ वर्षे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचे नाटक केले आणि आता सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम हलकारे देत निघाली आहे, असा दावा ठाकरे यांनी केला आहे.
‘हे पवारांचे जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळते’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या नव्या पोस्टसोबत २०२३ मधील जुनी पोस्ट जोडत तत्कालीन राजकीय परिस्थितीवर आपले मत मांडले होते. पवारांवरील या तिखट प्रतिक्रियेनंतर आता उद्याच्या पत्रकार परिषदेत ठाकरे कोणती राजकीय तोफ डागणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.








