प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्याच्या सुरक्षिततेबाबत मोठी मागणी केली आहे. पुण्याचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्वीकारावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे आणि थेट संपर्क साधून मुख्यमंत्र्यांना ही विनंती केली. त्या म्हणाल्या, “मी एक लोकप्रतिनिधी म्हणून, पुण्याची नागरिक म्हणून आणि एक महिला म्हणून हात जोडून विनंती करते की, आपण पुण्याची जबाबदारी स्वतः घ्यावी. पुण्याला न शोभणारं, न झेपणारं जे काही चाललेलं आहे, ते थांबवण्यासाठी आपणच पालकत्व घ्यावं.”
या मागणीवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवरील विश्वास असाच वाढत जावो, अशी प्रार्थना त्यांनी केली. दरेकर म्हणाले, “मी सुप्रियाताईंना धन्यवाद देतो. असाच विश्वास वृद्धिंगत होवो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या विश्वासाला जे वाटतं, पुण्यात पालकत्व घ्यावं, त्या पालकत्वाच्या भूमिकेतून देवेंद्रजी पुण्याचे संरक्षण करतील यावर मला पूर्ण विश्वास आहे.” या राजकीय प्रतिक्रियांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.








