पुणे, २६ नोव्हेंबर: पुणे न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील परिसराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावर मंदार किवळे याच्यावर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. या भयंकर घटनेत मंदारचा एका हाताचा पंजा मनगटापासून वेगळा झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंदारला त्याची वकील ॲड. शुभांगी परुळेकर यांनी धीर दिला.
कात्रज येथील शुभम चव्हाण खून प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याला मुंबई उच्च न्यायालयाने आठवडाभरापूर्वी अटींसह जामीन मंजूर केला होता. याच खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात आला होता. त्यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला गाठले. एकाने पिस्तूल काढून गोळीबार केला, तर इतरांनी कोयते उपसले.
जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या मंदारचा पाठलाग करून हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार केले. हे वार रोखताना त्याचे दोन्ही हात गंभीर जखमी झाले आणि एक हात मनगटापासून तुटून लोंबकळत होता. एवढा भयानक हल्ला होऊनही मंदार रक्ताच्या थारोळ्यातून उठला. त्याने हल्लेखोरांकडे पाहिले आणि रस्ता ओलांडून तो पदपथावर कोसळला.
गेट क्रमांक ०४ मधून बाहेर आल्यावर ॲड. परुळेकर यांना धावपळ आणि गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यांनी पोलिसांना पाहण्याची विनंती केली, मात्र हल्ला सुरू असताना कोणीही मदतीला पुढे आले नाही. रक्ताने माखलेल्या मंदारला “माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस…” असा धीर देताना त्याच्या डोळ्यांत जगण्याची धडपड दिसत होती, असा थरारक अनुभव परुळेकर यांनी सांगितला.
मंदार हा सराईत गुन्हेगार नव्हता. एखाद्या गुन्ह्यात तो आरोपी असला तरी आधी तो एक माणूस होता आणि याच माणुसकीच्या नात्याने लोकांनी त्याला मदत करणे अपेक्षित होते, अशी खंत ॲड. परुळेकर यांनी व्यक्त केली. मात्र, लोक केवळ बघ्याची भूमिका घेत मोबाईलवर व्हिडिओ काढत उभे होते. रिक्षाचालकांनीही त्याला रुग्णालयात नेण्यास नकार दिला. न्यायालयाबाहेर असा हल्ला होणे अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.







