प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर: पुण्यातील शिवाजीनगर भागात शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर एकूण ६ जणांनी गोळीबार करत आणि कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या निर्घृण हल्ल्यात मंदार रक्ताच्या थारोळ्यात पडला असून, त्याचे दोन्ही हात तुटून लटकत असल्याचे उघड झाले आहे. या थरारक घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
शुभम चव्हाण याच्या हत्येला १ वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. या हत्येचा बदला घेण्यासाठी चव्हाण याच्या साथीदारांनी साधारण वर्षभरापूर्वीपासूनच हा कट रचण्यास सुरुवात केली होती. शुभमच्या मारेकऱ्यांना संपवण्याचा डाव त्यांनी आखला होता.
या हत्या प्रकरणात आरोपी असलेला मंदार किवळे हा ४ ते ५ दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. तो बाहेर आल्याची माहिती मिळताच आरोपींनी त्याच्यावर पाळत ठेवून १ ते २ दिवसांपासून सापळा (ट्रॅप) लावला होता.
न्यायालयीन कामकाजासाठी मंदार किवळे आज शिवाजीनगर भागात जात असताना दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याला गाठून हा रक्तरंजित हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यातील आरोपींची ओळख पटली असून, त्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली आहेत.




