प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेस नेते धीरज देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा निवड होताच नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या निवडीनंतर लगेचच भाजपने धीरज देशमुख यांच्याविरुद्ध थेट केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) तक्रार दाखल केली असून, संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध देशमुख या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने संचालक मंडळाच्या एकूण १९ पैकी १४ जागांवर विजय मिळवला. तर, महायुतीच्या परिवर्तन पॅनेलला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. यानंतर देशमुख कुटुंबीयांचे बँकेवरील वर्चस्व कायम राहिले असून, उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड झाली आहे.
काँग्रेसने या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर भाजपने धीरज देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. देशमुख यांच्या मागील अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनेक कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कर्ज दिलेल्या कंपन्यांमध्ये धीरज देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय संचालक असल्याचा दावा संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.
या नियमबाह्य कामकाजाचा ठपका ठेवत आरबीआयने लातूर जिल्हा बँकेकडून ८ लाखांचा दंड वसूल केल्याचा उल्लेख एका नोटिशीत करण्यात आला आहे. याच कारणास्तव धीरज देशमुख यांना अपात्र ठरवण्यासाठी निलंगेकर समर्थकांकडून आरबीआयकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे लातूरमधील भाजप आणि काँग्रेसमधील हा संघर्ष आणखी तापला आहे.
📌 महत्त्वाच्या बातम्या
- लेक आराध्यासह वहिनीच्या वाढदिवसाला पोहोचली ऐश्वर्या, पण अभिषेक बच्चन गायब; श्वेताच्या पोस्टमुळे बच्चन कुटुंब पुन्हा चर्चेत
- ‘तू वाचणार आहेस…’; हात छाटलेल्या मंदार किवळेला महिला वकिलाने दिला धीर, न्यायालयाबाहेरील थरार
- केंद्रीय मंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत देश सोडू नये; आगामी अधिवेशनाबाबत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे आदेश








