मुंबई, 22 नोव्हेंबर: थंडीचा कडाका वाढला की आरोग्याच्या अनेक तक्रारी डोकं वर काढतात. या काळात सर्दी आणि खोकल्यासोबतच अनेकांना सांधेदुखी आणि शरीरावर सूज येण्याचा त्रास उद्भवतो. हिवाळ्याच्या दिवसांत काहींच्या पायाच्या बोटांना सूज येते, तर काहींना संपूर्ण ऋतूभर सर्दी-खोकला सतावतो. या वाढत्या सांधेदुखीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी उबदार कपड्यांच्या वापरासह काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत.
सांधेदुखी कमी करण्यासाठी नियमित मालिश करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. यासाठी मोहरी किंवा तिळाचे तेल कोमट करून दररोज रात्री झोपण्यापूर्वी किमान १५ मिनिटे सांध्यांना हलक्या हाताने मालिश करावी. मात्र, सांध्यांवर आधीच सूज असेल तर मालिश करताना जास्त दाब देणे टाळावे.
थंडीच्या वातावरणात सांधेदुखी वाढल्यास गरम पाण्याची पिशवी किंवा हीटिंग पॅडच्या मदतीने उबदार शेक घेणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. दुखणाऱ्या सांध्यावर एखादा टॉवेल किंवा कापड ठेवून त्यावर १५ ते २० मिनिटे शेक द्यावा. अति उष्णतेमुळे त्वचेला इजा होऊ शकते, त्यामुळे लालसरपणा किंवा जळजळ जाणवल्यास तात्काळ शेक देणे थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सांध्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी योग्य उबदार कपड्यांचा वापर करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुडघ्यांना आराम मिळण्यासाठी ‘नी सपोर्ट’ (knee support) वापरता येऊ शकतो. विशेषतः चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी जास्त वेळ जमिनीवर बसणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
थंड हवामान असले तरीही शरीराची लवचिकता टिकवण्यासाठी व्यायाम थांबवू नये. मात्र, या व्यायामामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. शरीर सक्रिय ठेवण्यासाठी पवनमुक्तासन, ताडासन आणि वृक्षासन यांसारखी योगासने, तसेच अनुलोम-विलोमसारखे श्वसनाचे व्यायाम नियमित करावेत. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर काही समस्या असतील, तर हे करण्यापूर्वी फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हवामान विभागाचा अलर्ट: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, रविवारी विदर्भात पावसाची शक्यता
- अमोल कोल्हे-छगन भुजबळ भेटीत गैर काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका
- डायल 112 ते GPS ट्रॅकिंग: उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधांकडे दुर्लक्ष; देवेन भारतींचा दावा








