पुणे, 18 नोव्हेंबर: पुणे शहरालगतच्या ग्रामीण भागात जमिनींना आलेल्या अवाढव्य भावामुळे पैशांच्या हव्यासापोटी नातीगोती दुरावत असल्याचे एका भयंकर घटनेतून समोर आले आहे. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील मौजे सांगवी गावात जमिनीच्या वादातून सख्ख्या भाच्यानेच आपल्या दोन मित्रांच्या साथीने मामाची कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आहे. अशोक येनपुरे असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते गावचे पोलीस पाटील होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार १६ नोव्हेंबर रोजी घडला. सायंकाळी शेतातील कामे उरकून अशोक येनपुरे दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी मौजे सांगवीतील लमनदेव मंदिराजवळ मुख्य आरोपी भाचा प्रतीक रामदास शेजवळ (वय २२) आणि त्याच्या दोन मित्रांनी त्यांना अडवले. अशोक यांची आई लिलाबाई यांच्या नावावर असलेल्या वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कसोड पत्रावरून त्यांच्यात रस्त्यातच जोरदार वाद सुरू झाला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी येनपुरे यांच्या डोक्यावर, कानावर आणि हाताच्या दंडावर कोयत्याने गंभीर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या येनपुरे यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी राजगड पोलिसांनी मुख्य सूत्रधार प्रतीक शेजवळ याच्यासह त्याचे मित्र प्रज्वल ऊर्फ प्रशांत संतोष गोगावले (वय १८) आणि प्रणव कैलास गोगावले (वय १९) यांना अटक केली आहे.
अटकेनंतर तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. या भयंकर प्रकारामुळे येनपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या भाच्यानेच मामाचा जीव घेतल्याने नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला मुंबईतून अटक
- सत्ताधारी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करतायत; फायनान्सवाल्यांना पैसे नाहीत सांगा: मनोज जरांगे पाटील
- ‘खरा आनंद’: महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर आणि सूर्यकुमार यादव यांच्या भावुक पोस्ट








