नाशिक, 13 नोव्हेंबर: राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य करत, राज्यात ‘मर्जर-मर्जर’चा खेळ सुरू असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन योग्य वेळी निर्णय घेतील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सध्या कोण कोणाला भेटत आहे आणि काय चर्चा होत आहे, हे काहीच समजत नसल्याचे भुजबळ म्हणाले. या विलीनीकरणाच्या खेळाचे नियम ठरवायला हवेत, असे सांगत त्यांनी दोन्ही बाजूंनी सांघिक खेळ होण्याची अपेक्षा व्यक्त केली. आमच्यातील एखादा जातो आणि चर्चा करतो, हे क्रिकेट सुरू असल्याचे सांगत त्यांनी तुटक-तुटक चर्चेऐवजी सर्वांनी एकत्रित चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
दोन्ही राष्ट्रवादी किंवा दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आपल्याला आनंदच होईल, असे भुजबळ यांनी सांगितले. मात्र, हा प्रश्न अत्यंत जटिल असल्याचे ते म्हणाले. अजितदादा गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, ते असते तर सर्वांना सांभाळून पुढे गेले असते, असेही त्यांनी म्हटले. सध्या आपला गट ‘एनडीए’सोबत आहे, तर शरद पवार यांचा पक्ष ‘इंडिया’ आघाडीसोबत आहे, त्यामुळे एकत्र आल्यावर कुणासोबत राहायचे हा मोठा प्रश्न असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. भाजप आणि मुख्यमंत्र्यांना दूर ठेवून किंवा त्यांच्या संमतीशिवाय कोणतेही पाऊल टाकता येणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शरद पवार यांच्यासोबतच्या संबंधांवर बोलताना भुजबळ यांनी आपल्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोन मोठे मार्गदर्शक असल्याचे सांगितले. पवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व परिपक्व नेते असून, राजकारणात मतभेद असले तरी ते नातेसंबंध जपतात, असे भुजबळ म्हणाले. आजही आपण त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, असे सांगतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यात पवार साहेब आणि आपला सिंहाचा वाटा होता व बाकीचे लोक नंतर आल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीची सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी; वनडेत सर्वाधिक ‘डक’चा विक्रम
- हवामान बदलानुसार प्रकृतीची काळजी कशी घ्यावी? आजारपण टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या महत्त्वाच्या टिप्स
- राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंचा खुलासा; म्हणाल्या ‘माझा भाऊ गेला, तेव्हाच विषय संपला’
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







