प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये जाण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. दोन वर्षे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर गुजरातची साथ सोडणे ही हार्दिकची मोठी चूक (blunder) होती, असे स्पष्ट मत कैफने व्यक्त केले आहे.
आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला पंजाब किंग्सकडे ट्रेड केले आहे. त्याच्या बदल्यात अर्शदीप सिंग मुंबईच्या संघात गेला आहे. आता पंजाबमध्ये हार्दिक श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मुंबईमधील दुसऱ्या पर्वात कर्णधारपद भूषवलेल्या हार्दिकला पंजाबमध्ये मात्र वेगळ्या भूमिकेत दिसेल. कैफच्या मते, कर्णधारपदाची जबाबदारी नसल्याने हार्दिकला आता स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यास मोठी मदत होईल.
कैफने म्हटले की, “हार्दिकने गुजरात टायटन्स सोडणे ही एक मोठी चूक होती. मला वाटतं तो एक भावनिक निर्णय होता. त्याचे मुंबई इंडियन्ससोबत जुने नाते होते आणि कदाचित त्यामुळेच तो तिकडे परत गेला. तुम्ही गुजरातला चॅम्पियन बनवले आणि तिथे तुम्ही किंग होतात. पण नेहमीच असे निर्णय घेणे कठीण असते. त्या एका निर्णयामुळे त्याचे नुकसान झाले. कर्णधारपद आणि कामगिरीच्या बाबतीत तो मागे पडला. त्याने मुंबईसोबतचा हा दुसरा टप्पा लवकरात लवकर विसरून पुढे जाणे त्याच्यासाठी चांगले राहील.”
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने २०२५ च्या आयपीएलमध्ये संघाला अंतिम फेरीत नेले होते. आता त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत बोलताना कैफ म्हणाला, “अनेक खेळाडूंना कर्णधारपद हवे असते, पण या दडपणाखाली अनेक जण चांगली कामगिरी करू शकत नाहीत. आयपीएलमध्ये हे आणखी कठीण होते. त्यामुळे हार्दिक कर्णधार नाही, हे त्याच्यासाठी चांगलेच आहे.”
कैफने पुढे म्हटले की, “आता पंजाब किंग्समध्ये त्याने फलंदाज, गोलंदाज आणि फिनिशर म्हणून आपला फॉर्म परत मिळवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. तो एक महान खेळाडू आहे यात शंका नाही, त्यामुळे तो कर्णधार नसणे ही चांगली गोष्ट आहे. अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळणे खूप अवघड असते.”
या ट्रेडमध्ये हार्दिक पांड्या १८ कोटी रुपयांना पंजाब किंग्समध्ये दाखल झाला आहे. यापूर्वी त्याचे मानधन १६.३५ कोटी रुपये होते. दुसरीकडे, अर्शदीप सिंग त्याच्या सध्याच्या १८ कोटी रुपयांच्या मानधनावरच मुंबई इंडियन्समध्ये गेला आहे. पंजाब किंग्स हा हार्दिकच्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरा संघ ठरला आहे.
२०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिकने या संघासोबत ७ हंगाम घालवले आणि २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये जेतेपदे जिंकली. २०२२ पूर्वी मुंबईने त्याला सोडल्यानंतर तो गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला. पहिल्याच हंगामात (२०२२) त्याने ४८७ धावा आणि ८ बळी घेत संघाला विजेतेपद मिळवून दिले. २०२३ मध्येही त्याने ३४६ धावा आणि ३ बळी घेत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते, जिथे त्यांचा चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव झाला होता.
दोन यशस्वी वर्षांनंतर २०२४ मध्ये हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि त्याने रोहित शर्माची जागा घेत कर्णधारपद स्वीकारले. मात्र, त्याची ही दुसरी कारकीर्द पहिल्यासारखी यशस्वी ठरली नाही. २०२४ मध्ये मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला होता, २०२५ मध्ये त्यांनी प्लेऑफ गाठले आणि २०२६ च्या हंगामात ते नवव्या स्थानावर राहिले.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिवाळीत सुनेत्रा पवारांची शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी; पिठलं-भाकरी खात जाणून घेतल्या अडचणी
- माझा भाऊ मंत्री होऊ दे, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय; सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा
- रब्बी हंगामासाठी खतांवर ६२,३७० कोटींचे अनुदान; मुद्रा योजनेसाठी ५ हजार कोटी मंजूर
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







