नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांवर शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले, त्यानंतर हा विषय आपल्यासाठी तेव्हाच संपला असून आता यावर अधिक काहीही बोलायचे नाही, असे सुळे यांनी म्हटले आहे.
विलिनीकरणाच्या मुद्द्यावर कोणीही आपल्याशी चर्चा केलेली नाही, असे स्पष्ट करत सुळे यांनी सांगितले की, “ज्या दिवशी माझा भाऊ गेला आणि त्यानंतर दोन-चार दिवसांत ज्या काही घटना घडल्या, त्यानंतर मी स्वतः या विषयावर पडदा टाकला आहे.” यामुळे आता वेगळे बोलण्याचे कारण उरलेले नाही. पत्रकारांनी या चर्चांना पूर्णविराम समजायचा का, असे विचारले असता, पूर्णविरामचा प्रश्नच नसून भाऊ गेला तेव्हाच आपल्यासाठी विलिनीकरणाचा विषय संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘दादा’ हयात असताना आणि त्यांच्याशी याबाबत चर्चा झाली होती का, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दादांनी त्यांच्याशी आणि संपूर्ण पक्षाशी संवाद साधला होता. १७ जानेवारी रोजीचा गोविंदबागेतील व्हिडिओ सर्वांनी दाखवला असून त्यात काहीही नवीन नाही, जगाला सगळे माहिती आहे. दादा आणि आम्ही काय करणार आहोत, हे संपूर्ण जगाला माहिती होते व यात लपवून ठेवण्यासारखे काहीच नव्हते. मात्र, दादा अचानक निघून गेल्यानंतर आपण या विषयाला पूर्णविराम दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार रोहित पाटील यांनीही या चर्चांवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. विलिनीकरण किंवा पाठिंबा देण्याबाबत आपण कोणतेही विधान केले नसून, आपल्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बातम्यांची आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे ते म्हणाले. तसेच, पक्ष नेतृत्वाशी अद्याप याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही विलिनीकरणाच्या या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. भाजपसोबत असताना विलिनीकरणाचा विषयच येत नाही, असे ते म्हणाले. तसेच “आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे एकत्रीकरण होणार नाही,” हे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य केवळ सत्तेचा अहंकार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘२० वर्षे परिणाम भोगतोय’, ‘सीरियल किसर’ इमेजवर इमरान हाशमीचे स्पष्ट भाष्य
- मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळासह ५ ठिकाणे टार्गेटवर
- आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात? एकाचा मृत्यू; विरोधकांचे गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








