मुंबई, 12 नोव्हेंबर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले असून, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे नेते सतेज (बंटी) पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सतेज पाटील यांचे साम्राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या वक्रदृष्टीने उद्ध्वस्त होईल, या चंद्रकांतदादांच्या इशाऱ्यावर राऊतांनी बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत पलटवार केला. हातात सत्ता असली की कुत्र्यालाही वाघ झाल्यासारखे वाटते, असा घणाघात करत राऊत म्हणाले की, जे स्वतः कर्तबगार नसतात त्यांना दुसऱ्याच्या कर्तृत्वाचा द्वेष वाटतो. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे लोक विध्वंसक विचारांचे असल्याची टीकाही त्यांनी केली.
डी. वाय. पाटील हे स्कूटरवरून फिरायचे आणि त्यांचा गोकुळशी काय संबंध, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाचाही राऊत यांनी समाचार घेतला. स्कूटरवर फिरणाऱ्या व्यक्तीने स्वबळावर आणि अक्कलहुशारीने जगभरात शैक्षणिक साम्राज्य उभे केले, याचे मराठी माणसाला कौतुक आहे. नरेंद्र मोदी चहा विकायचे, मग त्यांचे वैभव कसे उभे राहिले? गौतम अदानीही स्कूटरवर फिरायचे. देशातील सर्वात मोठा उद्योगपती गुजरातचा होऊ शकतो, तर मग डी. वाय. पाटलांनी साम्राज्य कसे उभे केले हा प्रश्न तुम्हाला का पडतो, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसेच, कोथरूडमध्ये १०-२० हजारांना मते विकत घेण्यासाठी भसाभसा वाटलेला पैसा तंत्रशिक्षण की महसूल खात्यातून आला, अशी विचारणाही त्यांनी केली. एका मंत्र्याची भाषा दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्याची असू नये, यासाठी फडणवीसांनी या नेत्यांना आवर घालावा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.
गोकुळच्या राजकारणाबाबत बोलताना राऊत यांनी थेट अमित शाह यांच्यावर आरोप केले. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी समविचारी पॅनेलच्या १३ संचालकांना बहुमत देऊनही फडणवीस यांनी शाहांच्या दबावाखाली चार शासकीय सदस्य नेमले. अमित शाह यांना गोकुळ दूध संघ गुजरातच्या अमूलला विकायचा असून कोल्हापुरातील दोन ‘वळू’ त्यांना मदत करत आहेत, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. या ‘वळूंनी’ घातलेल्या गोंधळामुळेच अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. ही कृती लोकशाहीला मारक असून या ओरबाडण्यामुळे भाजपच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे राऊत म्हणाले.
हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांना असे वागणे शोभत नाही, असे सांगत राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. जे नेते ईडीला घाबरून पळून गेले होते, ते आता शड्डू ठोकत आहेत. राजकारणाचे दिवस बदलत असतात, त्यामुळे पुन्हा पळून जाण्याची वेळ येऊ नये. या ‘वळूंना’ कोणीही, विशेषतः शरद पवार साहेबांनी तरी दारात उभे करू नये, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी असते तर त्यांनी कायद्याची मोडतोड करून प्रशासक नेमले नसते. हसन मुश्रीफ प्रशासक नेमण्याची भाषा करत असताना मुख्यमंत्री डुलक्या काढत आहेत का? शेतकरी गोकुळमध्ये ‘रेजीम चेंज’ करत आहेत आणि ते तुम्हाला मान्य नसल्याचेही ते म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) संभाव्य फुटीवरही भाष्य केले. सुनेत्रा पवारांचा म्हणजेच अमित शाहांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे, त्यातील २० ते २२ आमदार कोणत्याही क्षणी बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. ते केवळ गप्पा मारण्यासाठी शरद पवारांना भेटत नाहीत. अजित पवारांचे आता नेतृत्व राहिलेले नसून त्यांना स्वाभिमान गहाण ठेवून गुलामी करावी लागत आहे. हे आमदार स्वगृही परतले तर त्याला विलीनीकरण म्हणता येणार नाही किंवा ते इतर एक-दोन पक्षांत प्रवेश करतील. सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादी आणि शिंदेंचा पक्ष ही दोन्ही भाजपची ‘अंगवस्त्र’ आहेत, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- सय्यद मुश्ताक अली करंडक २०२६-२७ साठी केरळच्या संघाची घोषणा; संजू सॅमसनकडे पुन्हा कर्णधारपद
- पाकिस्तान-श्रीलंका दुसरी कसोटी लाहोरहून रावळपिंडीला हलवली; सामन्याच्या तारखा मात्र कायम
- उस्मान ख्वाजाकडून लॉर्ड्सवरील ‘त्या’ घटनेवर मौनभंग, एमसीसी सदस्यांवर वर्णद्वेषी शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








