मुंबई/धाराशिव, 12 नोव्हेंबर: राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच, आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या शक्यतेवरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि मंत्री भरत गोगावले यांनी या अनुषंगाने महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र आल्या, तर माझ्यापेक्षा जास्त आनंदी माणूस दुसरा कोणीही नसेल, असे स्पष्ट मत खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वीही ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आनंद होईल, असे म्हटले होते. आता त्यांनी पुन्हा त्याच भूमिकेचा पुनरुच्चार केल्याने ठाकरे आणि शिंदे गटाच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला बळ मिळाले आहे. नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या ओमराजेंच्या या विधानामुळे राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले असून, प्रत्यक्षात काही पावले उचलली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यानंतर सुरू झालेल्या या चर्चेवर मंत्री भरत गोगावले यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सद्यस्थिती आणि भविष्यातील चित्र पाहता आम्हाला असे काही वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राजकारणात कधीही काहीही घडू शकते; सकाळचा संध्याकाळी आणि संध्याकाळचा सकाळी कुठे असेल, हे सांगता येत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
गुलाबराव पाटील यांना या एकत्रीकरणाबाबत कदाचित काही भनक लागली असू शकते, अशी शक्यताही भरत गोगावले यांनी बोलून दाखवली. त्यामुळे येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण स्वतः पाटील यांना याबाबत विचारणा करणार असल्याचेही गोगावले यांनी सांगितले.
दरम्यान, या एकत्रीकरणाच्या मुद्द्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वेचे उदाहरण देत आपली भूमिका मांडली होती. आपण यावर काहीही सांगू शकत नसून, आपण केवळ आगगाडीचा डबा आहोत, असे ते म्हणाले होते. एकनाथ शिंदे हे आमचे इंजिन असून, इंजिन जिथे जाईल तिथेच डबा जाईल. त्यामुळे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तोच अंतिम असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत विरुद्ध न्यूझीलंड चौथा एकदिवसीय सामना: खेळपट्टी, हवामान आणि संभाव्य प्लेइंग 11
- ‘ते वाक्य रागाच्या भरात बोलून गेलो’; गोकुळमध्ये सत्ता येताच हसन मुश्रीफांना उपरती
- सराव सत्रात अर्शदीप सिंगने बाद केल्यानंतर विराट कोहली संतापला
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








