प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी कर्णधारांचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. मुंबई इंडियन्सच्या (MI) कर्णधारपदी रोहित शर्मा पुन्हा परतणार असल्याची माहिती समोर आली असून, राजस्थान रॉयल्सचे (RR) नेतृत्व रियान परागच करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. याच वेळी हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्यात मुंबई आणि पंजाब किंग्ज (PBKS) दरम्यान मोठा ट्रेड होण्याची शक्यता आहे.
सलग तीन हंगामानंतर मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या जागी रोहित शर्माकडे पुन्हा नेतृत्वाची धुरा सोपवणार आहे. माहितीनुसार, फ्रँचायझीकडून १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या रचनेत तिलक वर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, तर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांसारखे वरिष्ठ खेळाडू नेतृत्व गटाचा महत्त्वाचा भाग असतील.
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये संघाला पाच आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली आहेत. रोहितने आजवर १६३ सामन्यांत मुंबईचे नेतृत्व केले असून, त्यात ९१ विजय आणि ६८ पराभव मिळवले आहेत, तर चार सामने टाय झाले आहेत. त्याची विजयाची टक्केवारी ५५.८२ इतकी आहे.
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स आगामी हंगामासाठी आपल्या सध्याच्या नेतृत्व फळीत कोणताही बदल करणार नसल्याचे चित्र आहे. पत्रकार राहुल रावत यांच्या माहितीनुसार, २०२६ च्या हंगामापूर्वी पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारलेला रियान पराग २०२७ मध्येही संघाचे नेतृत्व करेल. यशस्वी जयस्वाल उपकर्णधार म्हणून कायम राहण्याची अपेक्षा आहे. २०१९ पासून राजस्थानशी जोडला गेलेला पराग आता संघातील एक प्रमुख खेळाडू बनला आहे.
अष्टपैलू रियान परागने आतापर्यंत २२ आयपीएल सामन्यांमध्ये राजस्थानचे कर्णधारपद भूषवले आहे. यामध्ये संघाने १० विजय मिळवले असून १२ सामने गमावले आहेत. त्याची विजयाची टक्केवारी ४५.४५ इतकी आहे. आगामी हंगामात परागच्या नेतृत्वात अधिक सातत्य दिसेल, अशी फ्रँचायझीला अपेक्षा आहे.
कर्णधारपदाच्या या घडामोडींसोबतच मुंबई आणि पंजाब किंग्जमध्ये खेळाडूंची मोठी आदलाबदल (ट्रेड) अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडून पंजाब किंग्जमध्ये सामील होणार आहे, तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग पंजाबकडून मुंबईत दाखल होणार आहे. दोन्ही फ्रँचायझींनी बीसीसीआयकडे याबाबतचे ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ सादर केले आहेत.
दोन्ही खेळाडूंनी या बदलाला सहमती दर्शवली असून, करारांची देवाणघेवाण आणि बीसीसीआयच्या मान्यतेची अंतिम प्रक्रिया बाकी आहे. हार्दिक पंजाबमध्ये गेल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरसोबत खेळताना दिसेल; मात्र तो केवळ खेळाडू म्हणून संघात सामील होण्याची शक्यता आहे. तर मुंबईच्या ताफ्यात अर्शदीपच्या येण्याने जसप्रीत बुमराहसोबत आणखी एक प्रमुख वेगवान गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध होईल.
बीसीसीआयची अंतिम मंजुरी मिळताच या ट्रेडची अधिकृत घोषणा होईल. या मोठ्या ट्रेडमुळे रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदेंची रुग्णालयात जाऊन शरद पवारांना भेट; मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून प्रकृतीची विचारपूस
- देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय: मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
- सरकार कोणत्याही पक्षाचं असो, सत्तेत ५ मराठा मंत्री असायलाच हवेत: मनोज जरांगे पाटील
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








