प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मविआकडून ३-२ असा पराभव झाल्यानंतर आता महायुतीमधील शिंदे सेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवाचे खापर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर फोडले होते. या आरोपांनंतर शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी बन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही,” असा सज्जड दम भरत राणे यांनी आपण बन यांचे मित्र नसल्याचे स्पष्ट केले.
नवनाथ बन यांच्या राजकीय कारकीर्दीवर बोट ठेवत निलेश राणे म्हणाले की, बन हे आपले मित्र नसून ज्युनिअर आहेत. आपण २००९ मध्ये खासदार झालो, तेव्हा बन चड्डीत होते, असा खोचक टोला त्यांनी लगावला. ऐऱ्यागैऱ्यांना आपण मित्र बनवत नसल्याचे सांगत राणे यांनी प्रश्न विचारला की, आम्हाला जाब विचारणारे तुम्ही कोण? आम्ही केवळ आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाच उत्तर देऊ. पत्रकारिता सोडून आताच कुठे बन यांनी निवडणूक जिंकली आहे, ती कशी जिंकली हे नंतर सांगेन, असा सूचक इशाराही राणे यांनी दिला.
शिवसेनेने शिक्षक मतदारसंघात सानप यांना उमेदवारी दिल्यानेच पुण्याची पदवीधरची जागा गेल्याचा आरोप बन यांनी केला होता. यावर पलटवार करताना राणे यांनी विचारले की, मग भाजपने पदवीधरला उमेदवार दिल्याने आमची शिक्षक मतदारसंघाची जागा गेली, असे आम्ही म्हणायचे का? मित्रपक्षाचा पराभव हा आपलाच पराभव मानून नियोजन कुठे चुकले याचे आत्मपरीक्षण करायला हवे. एक पराभव झाला म्हणून शिंदे साहेबांचे नाव घेण्याइतके तुम्ही मोठे झालेले नाहीत, असेही राणे यांनी सुनावले.
भाजपला मदत केली नसल्याचा आरोप फेटाळून लावताना निलेश राणे यांनी स्पष्ट केले की, ते स्वतः साताऱ्यात होते आणि त्यांच्यावर वाई व फलटणची जबाबदारी होती. पदवीधरच्या कामासाठी भाजपचा एकही माणूस त्यांच्याकडे आला नाही. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखालाही भाजपचा नियोजन अधिकारी किंवा निरीक्षक कोण आहे, हे माहित नव्हते. भाजपकडून एकही संदेश न येऊनही आम्ही सहकार्य केले, त्यामुळे बन यांनी आम्हाला काम कसे करायचे हे शिकवू नये, असे राणे म्हणाले. तसेच, या सगळ्यात धंगेकरांचा विषय कुठून आला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना नवनाथ बन यांना भाजपने संमती दिली आहे का, हे आधी स्पष्ट करावे अशी मागणी राणे यांनी केली. प्रवक्त्याने आपले काम करावे, विनाकारण निराधार आरोप करू नयेत. शिंदे साहेबांवर उगाच चिखलफेक केली, तर आम्ही शब्द जपून वापरणार नाही आणि जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीतच असतो, असा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक निवडणुकीची पुस्तके उघडली तर त्याचा फायदा केवळ विरोधकांना होईल, ही अक्कल बन यांनी बाळगावी, असा सल्लाही निलेश राणे यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- स्मृती मंधानाचा खुलासा: वर्ल्ड कप विजयानंतर धोनीने पाठवला होता खास व्हॉट्सॲप मेसेज
- शेतकऱ्यांबाबतच्या विधानावरून एकनाथ शिंदे संतापले; आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
- “तुझी लायकी किती तू बोलतो किती!” नवनाथ बन यांच्या आरोपांनंतर निलेश राणे आक्रमक; महायुतीत वाद
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








