पुणे, 11 ऑक्टोबर: पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी मोबाईल नेटवर्क जामर लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, ‘तुम्ही आंदोलनाला जामर लावू शकता, मात्र आंबेडकरी विचारांना जामर लावू शकणार नाही,’ असा घणाघात त्यांनी सरकारवर केला.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुजात आंबेडकर तेथे आले होते. जोपर्यंत जामर हटवला जात नाही, तोपर्यंत आपला आवाज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाही, असे सांगत त्यांनी आंदोलनाला नावे ठेवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांकडून आंदोलनाला राजकीय वळण लागत असल्याचे म्हटले जात आहे. यावर पलटवार करताना सुजात आंबेडकर यांनी, ‘मग भीमनवार यांची नियुक्ती अराजकीय होती का?’ असा थेट सवाल उपस्थित केला. दिल्लीतील जंतरमंतरवरही इंटरनेट बंद केले जात असल्याचा दाखला देत, जनतेला घाबरणारे हे पहिलेच सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
आपण ही व्यवस्था बदलण्यासाठी आलो असून आंदोलक विद्यार्थ्यांसाठी योग्य ‘सुधार कायदा’ आणायला हवा, असे ते म्हणाले. तसेच, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने आणि मोफत फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, उपस्थित विद्यार्थ्यांनी या वेळी जोरदार थाळ्या वाजवत आणि घोषणाबाजी करत त्यांच्या भूमिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.








