प्रतिनिधी, 24 नोव्हेंबर: दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत इंडिया अ आणि पाकिस्तान शाहीन यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाला ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामन्यानंतर शाहबाज अहमद बाद झाल्याबद्दल कर्णधार तिलक वर्माने त्याच्यावर उघडपणे टीका केली होती. यावरून भारताचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणे याने तिलक वर्माला चांगलेच फटकारले आहे.
पाकिस्तानने दिलेल्या ३१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ २६५ धावांत गारद झाला. या सामन्यात तिलक आणि शाहबाज यांनी सातव्या विकेटसाठी ११२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला विशाल लक्ष्याच्या जवळ नेले होते. मात्र, शाहबाज बाद होताच अवघ्या ३ धावांच्या अंतरात भारताने तीन विकेट्स गमावल्या. सामन्यानंतरच्या सादरीकरणात तिलकने शाहबाजवर निशाणा साधत, त्याने आणखी दोन षटके फलंदाजी केली असती, तर संघाने सामना जिंकला असता, असे म्हटले होते.
तिलक वर्माच्या या सार्वजनिक वक्तव्यावर अजिंक्य रहाणेने नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूवर उघडपणे टीका करण्याऐवजी त्याने ड्रेसिंग रूममध्ये सांगायला हवे होते, असे रहाणेने म्हटले आहे. तो म्हणाला, “जगासमोर तुम्ही तुमच्या खेळाडूबद्दल बोलावं असं कोणालाही वाटत नाही. तुम्हाला काही सांगायचं असेल, तर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सांगा – याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो.”
रहाणेने पुढे तिलकची पाठराखण करताना तो या चुकीतून धडा घेईल, असा विश्वासही व्यक्त केला. “पाहा, हे क्रिकेटमध्ये घडतं. तुम्ही प्रयत्न करता, निकाल तुमच्या बाजूने लागतो किंवा लागत नाही. काही वेळा कर्णधार म्हणून तुम्हाला संधी मिळत नाही, कारण तुमच्या मनात अनेक गोष्टी सुरू असतात. तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये येता, तेव्हा तुम्हाला जे सांगायचं असतं ते कदाचित बाहेर येत नाही, दुसरंच काहीतरी बाहेर येतं,” असे रहाणेने स्पष्ट केले. “मला खात्री आहे की कर्णधार म्हणून तिलक वर्मा यातून शिकेल. गोष्टी कशा हाताळायच्या याचा हा त्याच्यासाठी एक अनुभव आहे,” असे तो म्हणाला.
तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार सुरुवात केली आणि ३१३ धावा धावफलकावर लावल्या. हसन नवाजने संयमी खेळ करत ७९ धावा केल्या आणि मधल्या व तळाच्या फळीतील फलंदाजांनीही धावा जमवल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. वैभव सूर्यवंशी लवकर बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्माने ७० धावांची आक्रमक खेळी केली. तिलकने संथ शतक झळकावले. शेवटची विकेट असताना तिलकने संथ खेळ करत धावा न घेतल्याने त्याच्यावरही टीका झाली होती. याच कारणामुळे भारताला लक्ष्यापर्यंत पोहोचता आले नाही. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावर शाब्दिक चकमकीही पाहायला मिळाल्या. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला आता यूएईविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे.








