प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळा परिसर आणि कँटीनमध्ये वडापाव विक्रीवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून, एका लहान विद्यार्थ्याने चक्क मुंढे यांच्याकडेच आपला आवडता वडापाव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. या दोघांच्या संवादाचा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
‘शाळेत वडापाववर बंदी घातली आहे. मात्र, वडापाव विक्री पुन्हा सुरू व्हावी, असे मला आणि माझ्या मित्रांना वाटते, यावर तुमचे काय म्हणणे आहे?’ असा थेट प्रश्न या विद्यार्थ्याने विचारला. मुलाची ही मागणी ऐकून तुकाराम मुंढे यांनी स्मितहास्य केले. त्यांनी अत्यंत मृदू भाषेत या विद्यार्थ्याला आवडत्या स्नॅक्सपलीकडे जाऊन विचार करण्याचा आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व समजावून सांगितले.
आपण वडापाव नाही खाल्ला तर आयुष्य थांबणार नाही, त्याऐवजी पौष्टिक आहार घेतल्यास शारीरिक विकास अधिक चांगला होईल, असे मुंढे यांनी त्याला सांगितले. रोज खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांबाबत विचार कसा बदलावा, हे मुलांना समजावून सांगणे हे आई-वडील आणि शाळेसमोरील मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुलांच्या विकासासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट, हेल्दी फॅट, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला संतुलित आहार आवश्यक आहे. त्यासाठी डाळ, शेंगा, दूध, दही आणि अंडी यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांवर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला. वडापाव खाल्ल्याने थेट नुकसान होईल असे नाही, मात्र मुले नियमितपणे काय खातात आणि पौष्टिक आहाराऐवजी किती स्नॅक्स खातात, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे मुंढे (Tukaram Mundhe) यांनी स्पष्ट केले.
याच संवादात विद्यार्थ्याने चायनीज पदार्थांबाबतही प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मुंढे यांनी कृत्रिम रंग आणि रसायनांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. चायनीज पद्धतीचा कोणताही पदार्थ चांगला नसून, तो कुठे बनवला जातो आणि तिथे स्वच्छतेची काय काळजी घेतली जाते हे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांबाबत माहिती नसल्यास सावध राहावे आणि चवीपेक्षा नेहमी आरोग्यालाच प्राधान्य दिले पाहिजे, असा कानमंत्र त्यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
- …म्हणून तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी नाना पाटेकरांना थेट कारगिल युद्धात पाठवले; थरारक किस्सा
- पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत दिपकेंचा मानसिक छळ? सीजेपीच्या आरोपाने खळबळ








