🕒 1 min read
तुम्ही एखादा भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर टाकता आणि लोक डान्स न बघता तुमच्या मागच्या पसाऱ्याकडे बघून टोमणे मारू लागतात… विचार करा तुमची अवस्था काय होईल? अगदी असंच काहीसं बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत (Shraddha Kapoor) घडलंय.
इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असणाऱ्या श्रद्धाने एक व्हिडीओ शेअर केला खरा, पण आता तिच्या डान्सपेक्षा तिच्या अस्ताव्यस्त घराचीच सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. बुधवारी रात्री उशिरा श्रद्धाने तिच्या अधिकृत अकाऊंटवरून चाहत्यांना एक सरप्राईज दिलं.
Shraddha Kapoor Dance Video
यात ती चक्क पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या गाण्यावर मनसोक्त आणि वेड्यासारखा डान्स करताना दिसत आहे. अत्यंत कॅज्युअल लूकमधील तिचा हा मजेदार व्हिडीओ तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदी याने शूट केलाय. पण, या व्हिडीओमध्ये लोकांचं लक्ष डान्सिंग स्किल्सपेक्षा तिच्या पाठीमागे असलेल्या अस्ताव्यस्त खोलीकडे गेलं आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला.
व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पडताच काही मिनिटांतच तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिच्या या दिलखुलास अंदाजाचं तोंडभरून कौतुक केलं.
दुसरीकडे काही अतिउत्साही नेटकऱ्यांनी मात्र तिच्या घरातील अस्वच्छतेवर थेट बोट ठेवत तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एका युझरने चक्क “बयो, डान्स करण्यापूर्वी घरातील पसारा तरी आवरून घ्यायचा” असा फुकटचा सल्ला दिला.
ट्रोलर्स इथेच थांबले नाहीत. एकाने तर घर किती घाण आहे, कमीत कमी डान्स करताना मागच्या बाजूला ग्रीन स्क्रीन तरी वापरायची असा थेट टोला लगावला. साहजिकच या कमेंट्स श्रद्धाच्या नजरेतून सुटल्या नाहीत. पण या ट्रोलिंगवर चिडण्याऐवजी तिने अत्यंत भन्नाट स्टाईलमध्ये या नेटकऱ्यांची बोलती बंद केली. एका युझरच्या कमेंटवर रिप्लाय देताना तिने मिश्कीलपणे लिहिलंय, “डियर मॉम… रिअल आयडीवरून कमेंट कर ना.”
तिच्या या एका उत्तराने सगळ्यांचीच मनं जिंकली आणि चाहत्यांनाही हसू आवरता आलं नाही. सध्या तिच्या या मजेशीर रिप्लायची इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणासोबतच राहुल मोदीची उपस्थितीही चाहत्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. व्हिडीओच्या सुरुवातीला राहुलचा आवाज ऐकू येत असल्याने त्यांच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा एकदा नव्याने उधाण आलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि राहुल गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अद्याप या दोघांनीही आपल्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नसलं तरी, या नव्या व्हिडीओने त्यांच्यातील केमिस्ट्री पुन्हा एकदा जगासमोर आणली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले ठरले निमित्त, सोन्या-चांदीच्या किमतीत अचानक झाली मोठी घसरण!
- वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने सचिन तेंडुलकरही थक्क, १५ वर्षांच्या पोराने मोडता मोडता सोडला ख्रिस गेलचा विक्रम!
- “हिंमत असेल, तर सलमान खानला बॅन करून दाखवा”; राखी सावंतची ‘डॉन ३’ वादात उडी, फरहान अख्तरला थेट आव्हान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












