🕒 1 min read
मुंबई– महानगरपालिकेच्या (Mumbai Mayor Election) निकालाने कोणालाच स्पष्ट बहुमत दिलेलं नाही, हे आता स्पष्ट झालंय. पण खरी गंमत तर आता सुरू झाली आहे. राजकारणात दोन आणि दोन नेहमी चार होत नाहीत, कधी कधी ते शून्यही होतात, याचा प्रत्यय सध्या मुंबईत येत आहे. एका बाजूला भाजपकडे ८९ नगरसेवकांचे तगडे पाठबळ आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त २९ शिलेदार आहेत. पण गंमत अशी आहे की, या २९ शिलेदारांशिवाय भाजपच्या ८९ आकड्याला काहीच किंमत उरत नाही. त्यामुळे आकड्यांच्या खेळात भाजप ‘जायंट’ असला, तरी ‘किंगमेकर’ मात्र शिंदेच आहेत.
Mumbai Mayor Election 2026
फॉर्म्युला १: अडीच-अडीच वर्षांचा सत्तेचा वाटा? बहुमताचा जादुई आकडा ११४ आहे आणि महायुतीकडे मिळून ११८ (८९+२९) संख्याबळ होतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तेचा पहिला आणि सर्वात चर्चिला जाणारा फॉर्म्युला म्हणजे ‘अडीच-अडीच वर्षे महापौरपद’. भाजपचा दावा आहे की, जास्त जागा असल्याने पहिली टर्म आम्हाला मिळावी. पण बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाचं इमोशनल कार्ड खेळत शिंदे गट पहिली टर्म मागू शकतो. इथेच खरी खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
फॉर्म्युला २: महापौर भाजपचा, पण मलईदार खाती शिंदेंना? जर भाजपने महापौरपदावर ठाम दावा केला, तर शिंदे गट ‘स्टँडिंग कमिटी’ (स्थायी समिती) सारखी महत्त्वाची आणि आर्थिकदृष्ट्या ताकदवर समिती मागू शकतो. मुंबईच्या तिजोरीची चावी ज्याच्याकडे, त्याचे महत्त्व महापौरांहून कमी नसते, हे चाणाक्ष एकनाथ शिंदे पक्के ओळखून आहेत. त्यामुळे “पद तुमचं, पण पॉवर आमची” असाही एक सौदा पडद्यामागे होऊ शकतो.
फॉर्म्युला ३: अनपेक्षित ट्विस्ट? तिसरा आणि सर्वात धोकादायक सिनेरियो म्हणजे जर सन्मानजनक वाटा मिळाला नाही, तर शिंदे गट काय भूमिका घेणार? संजय राऊत यांनी आधीच “शिंदेंचे नगरसेवक मूळचे शिवसैनिक आहेत” असं म्हणून आगीत तेल ओतलं आहे. त्यामुळे भाजपला प्रत्येक पाऊल फुंकून टाकावं लागणार आहे. सध्या तरी चेंडू शिंदेंच्या कोर्टात आहे आणि भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोस्टल रोडवर मुंबईकरांचा उत्साह; मॅरेथॉनमध्ये आमिर खानने सहकुटुंब घेतला भाग
- निशा परुळेकर यांचा ‘काटाकिर्र’ विजय; ठाकरेंच्या नेत्याचा गेम ओव्हर, भाजपचा गुलाल उधळला!
- रवीना टंडनने शिवसेनेसाठी घाम गाळला, पण मतदानालाच दांडी; अचानक असं काय घडलं?













