प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या संवेदनशील विषयावर भाष्य केले आहे. “कोहली ज्या पद्धतीने कसोटीतून निवृत्त झाला, तो विषय अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता,” असे मत जाफर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर व्यक्त केले.
जाफर यांनी स्पष्ट केले की, विराट कोहलीमध्ये अजूनही कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता होती आणि तो इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता. मात्र, निवृत्तीचा विषय जसा हाताळला गेला, त्यामुळे विराट काहीसा निराश दिसत होता. “विराटसारख्या खेळाडूला पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने स्टेडियमवर येतात. त्याची लोकप्रियता प्रचंड असून तो आणखी कसोटी क्रिकेट खेळू शकला असता,” असेही जाफर म्हणाले. जोपर्यंत विराट स्वतः यावर बोलत नाही, तोपर्यंत निश्चित काही सांगता येणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कसोटीतून निवृत्त होण्यापूर्वी कोहलीने या स्वरूपातील क्रिकेट खेळण्याची इच्छा दर्शवली होती. जानेवारी २०२५ मध्ये दिल्लीकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानात उतरणे, हे त्याच्या कसोटी क्रिकेटप्रती असलेल्या कटिबद्धतेचे संकेत मानले जात होते. मात्र, रिपोर्ट्सनुसार, एप्रिल २०२५ मध्ये परिस्थिती बदलली. इंग्लंड दौऱ्यासाठी एका युवा कर्णधाराला पाठबळ देण्याची टीम मॅनेजमेंटची योजना असल्याचे निवड समितीने कथितरित्या विराटला सांगितले.
या घडामोडींमुळे निराश झालेल्या कोहलीने आपण इंग्लंड दौऱ्यावर जाणार नसल्याचे निवडकर्त्यांना कळवले. त्याला आपला निर्णय बदलण्यासाठी समजावण्याचे प्रयत्न झाले, परंतु त्यात यश आले नाही. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना जाफर यांनी स्पष्ट केले की, भारतीय क्रिकेटमध्ये अनेक धाडसी निर्णय घेतले गेले आहेत; यातील काही यशस्वी ठरले, तर काहींमुळे खेळाडू व चाहत्यांची निराशा झाली. मात्र, काही विशिष्ट निर्णय आणि खेळाडूंशी संबंधित विषय अधिक चांगल्या कुटनितीने हाताळता येऊ शकतात, असे जाफर यांचे म्हणणे आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप; भाडोत्री गुंडांना पोलिसांची वर्दी दिल्याचा दावा
- “बॅटची इज्जत काढू नकोस”: अभिषेक शर्माची बॅट घेऊन फलंदाजीला उतरलेल्या प्रिन्स यादवचा खुलासा
- आदित्य ठाकरे ड्रग्स घेतात; दिशा सालियन प्रकरणी नार्कोटिक्सकडे चॅट्स असल्याचा नितेश राणेंचा गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









