Kolkata, 19 नोव्हेंबर: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी ओडिशविरुद्धच्या सामन्यात छत्तीसगडचा कर्णधार विकल्प तिवारी याने पहिले टी-२० शतक झळकावले. एलिट ग्रुप डी च्या या सामन्यात अवघ्या १७ वर्षीय विकल्पने ५६ चेंडूत ११९ धावांची तुफानी खेळी केली. यासह तो वैभव सूर्यवंशीनंतर टी-२० प्रकारात शतक झळकावणारा दुसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगडने २० षटकांत ४ बाद २२८ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर आयुष पांडे (४) आणि अमनदीप खरे (८) स्वस्तात माघारी परतल्यानंतर विकल्पने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने प्रथम देव आदित्य सिंगसोबत (२९ धावा) ७२ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर अजय जाधव मंडलसोबत ११२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मंडलने २५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४८ धावांचे योगदान दिले.
विकल्पने अवघ्या १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ४४ चेंडूत त्याच्या पहिल्या टी-२० शतकाला गवसणी घातली. डावाच्या सहाव्या षटकात सलग पाच चौकार मारणाऱ्या विकल्पने २१२.५० च्या स्ट्राईक रेटने १८ चौकार आणि ३ षटकार खेचले. ५६ चेंडूत ११९ धावा केल्यानंतर तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला. ओडिशाकडून देबब्रत प्रधानने दोन, तर सौरभ मुझुमदार आणि धर्मेंद्रसिंग जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
छत्तीसगडचा कर्णधार म्हणून टी-२० पदार्पणातील तिसऱ्याच सामन्यात विकल्प तिवारीने ओडिशविरुद्ध शतक झळकावले आहे. १७ वर्षे आणि ५५ दिवस या वयात हा पराक्रम करत वैभव सूर्यवंशीनंतर टी-२० मध्ये शतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.
या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ओडिशाचा संघ २० षटकांत ८ बाद १७७ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि छत्तीसगडने हा सामना ५१ धावांनी जिंकला. छत्तीसगडच्या जयंत यादवने ३ षटकांत २९ धावा देत ३ बळी घेतले, तर देव आदित्य सिंग आणि सौरभ मजुमदार यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. या डावात विकल्पने दोन षटके गोलंदाजी करत २६ धावा दिल्या. मात्र, त्याने ओडिशाचे प्रमुख फलंदाज कार्तिक बिस्वाल (५७) आणि शुभ्रांशू सेनापती (३१) यांचे दोन महत्त्वाचे झेल टिपले.
विकल्पने १४ नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्सवर उत्तराखंडविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण करताना अवघ्या १७ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा (२९४.१२ स्ट्राईक रेट) करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर १६ नोव्हेंबरला हैदराबादविरुद्ध तो पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला होता. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, त्याच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे आयपीएल फ्रँचायझींचेही लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे.
आगामी १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी अपात्र ठरणाऱ्या १९ वर्षीय खेळाडूंना ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने प्राधान्य दिल्याने विकल्पला नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषकाला मुकावे लागले होते. मात्र, आता तो २०२८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने आधीच आपली छाप सोडली आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याविरुद्ध वरिष्ठ स्तरावर पदार्पण करताना त्याने ३८.६० च्या सरासरीने आणि १३८.८४ च्या स्ट्राईक रेटने १९३ धावा करत २ बळी घेतले होते.
जानेवारी २०२६ मध्ये दिल्लीविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या विकल्पची दुसऱ्याच सामन्यात हैदराबादविरुद्ध ९४ धावांवर (१४३ चेंडू) बाद झाल्याने पहिल्या प्रथम श्रेणी शतकाची संधी थोडक्यात हुकली होती. रणजीमध्ये त्याने दोन अर्धशतकांसह ३०.२० च्या सरासरीने आणि ६२.५२ च्या स्ट्राईक रेटने ३०२ धावा केल्या आहेत.
तसेच, २०२६-२७ च्या रणजी हंगामात त्याने सौराष्ट्रविरुद्ध ४६, पंजाबविरुद्ध ४७ आणि हैदराबादविरुद्ध ६९ धावांची खेळी केली. ओडिशविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या वरिष्ठ देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २ सामन्यांत २५ ची सरासरी आणि २७७.७७ च्या स्ट्राईक रेटने ५० धावांची नोंद होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रेमसंबंधास नकार देणाऱ्या तरुणीवर चाकू हल्ला; दोन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या
- फायनान्स कंपनीच्या महिला अधिकाऱ्याची दंडेली; हप्ता थकल्याने शेतकऱ्याच्या पत्नी, मुलीला विकण्याची भाषा
- दिव्यात ‘तुकाराम मुंडें’च्या घरावर दरोडा; नामसाधर्म्यामुळे FDA आयुक्तांच्याच घरी चोरी झाल्याची उडाली खळबळ








