शूटिंगच्या सेटवर (Shooting Set Food) झगमगाट तर खूप असतो, पण तिथं काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना खायला नेमकं कसलं जेवण मिळतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय? याच प्रश्नावरून आता सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. कारण, डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंची (Tukaram Mundhe) नजर आता थेट चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंग स्थळांवर पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चित्रीकरणाच्या ठिकाणी मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. याचीच गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग) एका शिष्टमंडळाने थेट अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांची भेट घेतली.
Tukaram Mundhe Action
या महत्त्वपूर्ण भेटीत सेटवरील अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नाबाबत सविस्तर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न तयार करण्यापासून ते वितरणापर्यंत होणाऱ्या हलगर्जीपणावर कडक पावलं उचलण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
शिष्टमंडळाने या प्रकरणी काही ठोस मागण्या मुंढेंसमोर ठेवल्या आहेत. राज्यातील चित्रीकरण स्थळांवर अचानक तपासणी मोहीम राबवणे, अन्नाची प्रयोगशाळेत चाचणी करणे आणि निकृष्ट जेवण देणाऱ्या केटरर्सवर कठोर कारवाई करणे, अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.
तुकाराम मुंढेंनी नेहमीप्रमाणेच या विषयाचीही अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. पुढच्याच आठवड्यापासून यावर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता कलाकारांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रॉडक्शन हाऊस आणि केटरर्सचे धाबे दणाणले आहेत.
या शिष्टमंडळात बाबासाहेब पाटील, निर्माते नितीन धावणे, अभिनेत्री अपेक्षा चव्हाण यांच्यासह अभिनेते मिलिंद दास्ताने, सुनील पगार, दिग्दर्शक शिरीष राणे, चंद्रकांत विसपुते आणि अजय फुटाणे उपस्थित होते. आता प्रत्यक्ष कारवाई कधी आणि कशी होते, याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचं लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Commonwealth Games 2026 : भारताची दुहेरी कमाई! नीरज चोप्राचे सिल्वर, यशवीरच्या शेवटच्या थ्रोने भारताला कांस्य!
- रखडलेल्या झेडपी निवडणुकांचा मार्ग मोकळा? OBC आरक्षणाचे समीकरण बदलणार?
- ‘आपल्या मुली अशी भाषा कशी वापरू शकतात?’; आईवरून शिव्या देणाऱ्यांना मोदींची अनपेक्षित माफी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












