प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: रायगड जिल्ह्यातील वाढते राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. ‘अभिमन्यू झाला असेल तर चक्रव्यूह कसा भेदायचा, याचा विचार करेन,’ असा पलटवार त्यांनी केला आहे. तसेच, आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण टीकेला उत्तर देताना, ‘इतकं प्रचंड बौद्धिक ज्ञान ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पामराने काय बोलावं,’ असा उपरोधिक टोलाही तटकरे यांनी लगावला.
सध्या रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यावर बोलताना तटकरे यांनी पक्षाच्या ताकदीवर ठाम विश्वास व्यक्त केला. कार्यकर्ते इतर पक्षात जात असले तरी, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान कालही भक्कम होते, आजही आहे आणि भविष्यातही तितकेच मजबूत राहील, असा दावा त्यांनी केला. पत्रकारांनी त्यांना जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरून अभिमन्यूची उपमा दिली होती. त्यावर मिश्किलपणे उत्तर देताना तटकरे म्हणाले की, अशी परिस्थिती यापूर्वीही दोन-तीन वेळा येऊन गेली आहे. मात्र, त्यातून बाहेर पडूनच आज मी खासदार म्हणून तुमच्यासमोर बसलो आहे. त्यांच्या या विधानाची चर्चा आमदार दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या सातत्यपूर्ण टीकेच्या पार्श्वभूमीवर रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेबाबतही तटकरे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये पक्ष एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कालही एनडीएमध्ये होतो, आजही आहोत आणि भविष्यातही तिथेच राहू. तसेच राज्यातील महायुतीचा घटक म्हणूनच आमची पुढील वाटचाल राहील, असे सांगत त्यांनी पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले.
शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असताना प्रफुल्ल पटेल त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी विलीनीकरणाबाबत विचारले असता, हा विषय संपल्याचे आपण म्हटले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच, जर अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच विलीनीकरण झाले असते, या वक्तव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
विलीनीकरणाच्या तारखांबाबत पूर्वी का मौन बाळगले आणि आताच का खुलासा केला, यावर तटकरे यांनी सूचक भाष्य केले. मला माहिती तेव्हाही होती आणि आताही आहे. तेव्हा तारखा सांगितल्या नाहीत, पण आता सांगितल्या आहेत. यामागील राजकीय कारण मी योग्य वेळी सांगेन, असे ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनेही विलीनीकरणाचा विषय कायमचा संपला असून, सध्या केवळ माध्यमांमध्येच याबाबत चर्चा सुरू असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यात भूजल पातळीत मोठी घट; ८७ टक्के विहिरींचे पाणी गेले तळाला
- ‘अकबन’ चक्रीवादळाचा धोका: महाराष्ट्रात हवामान बदलणार, विदर्भ-मराठवाड्यात ४ दिवस पावसाचा अंदाज
- पहलगाम हल्ल्याच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’; सीबीआय-एनआयएची भीती दाखवून निवृत्त वकिलाचे ४ कोटी लुटले








