पहलगाम हल्ल्याच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’; सीबीआय-एनआयएची भीती दाखवून निवृत्त वकिलाचे ४ कोटी लुटले

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी न्यूयॉर्कमधील निवृत्त वकिलाला २२ दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवून ४ कोटींचा गंडा घातला.

Published On: 

Cyber fraud digital arrest scam alert concept illustration

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: नोएडामध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून न्यूयॉर्कमधील एका निवृत्त भारतीय वंशाच्या वकिलाला तब्बल ४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर भामट्यांनी स्वतःला सीबीआय, एनआयए आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पीडिताला दहशतवाद आणि मनी लाँड्रिंगच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर तब्बल २२ दिवस त्यांच्यावर ऑनलाइन पाळत ठेवून त्यांची आयुष्यभराची कमाई लुटली.

अतुल तलवार असे फसवणूक झालेल्या वकिलाचे नाव आहे. ते १९८२ मध्ये दिल्लीहून अमेरिकेत स्थायिक झाले होते. तिथे त्यांनी सुमारे ३० वर्षे कामगार संघटनांचे वकील म्हणून काम पाहिले. ३१ जुलै रोजी भारतात परतल्यानंतर ते गुरुग्राममध्ये आपल्या भावाकडे वास्तव्याला होते आणि नोएडातील सेक्टर-३० येथील आपल्या जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम पाहत होते.

या फसवणुकीची सुरुवात १७ ऑक्टोबर रोजी आलेल्या एका फोन कॉलने झाली. फोनवरील व्यक्तीने आपण मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तलवार यांचे आधार कार्ड सापडल्याचा दावा त्याने केला. तसेच, त्यांच्या नावाने उघडलेल्या कॅनरा बँकेच्या खात्यातून ५३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून, त्यापोटी तलवार यांना ५ कोटींचे कमिशन मिळाल्याचा आरोप केला. तलवार यांनी हे आरोप फेटाळताच त्यांना तातडीने अटक करण्याची धमकी देण्यात आली.

त्यानंतर भामट्यांनी सीबीआयचे सहसंचालक आणि एनआयएचे अधिकारी असल्याची बतावणी करत व्हॉट्सॲपवर काही बनावट गोपनीय कागदपत्रे पाठवली. ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांना सतत संपर्कात ठेवून ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. त्यांना फोन कट करण्यास, घराबाहेर पडण्यास किंवा कोणालाही भेटण्यास सक्त मनाई होती. त्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी १८ ऑक्टोबर रोजी भामट्यांनी त्यांना एक बनावट व्हिडीओ दाखवला, ज्यामध्ये त्यांच्या घराजवळून दोन सशस्त्र दहशतवाद्यांना अटक केल्याचे दृश्य होते.

१९ ऑक्टोबरपासून भामट्यांनी ऑनलाइन चौकशीचा फार्स सुरू केला. यादरम्यान तलवार यांच्या बँक खात्यांची आणि गुंतवणुकीची सर्व माहिती मिळवण्यात आली. भामट्यांनी त्यांना सिटी बँकेच्या ‘इंडिव्हिज्युअल रिटायरमेंट अकाउंट’मधील ३.८० लाख डॉलर्स काढण्यास भाग पाडले. तसेच, दोन ब्रोकरेज खात्यांमधील रक्कम वळवण्यासाठी आयटी तज्ज्ञांची मदत घेण्यास लावले. त्यांच्याकडून एक क्रिप्टोकरन्सी खातेही उघडण्यात आले. कर भरण्याच्या नावाखाली दीड कोटी रुपये आणि इथेरियमच्या स्वरूपात सुमारे अडीच कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले. अशा प्रकारे ७ नोव्हेंबरपर्यंत त्यांची सुमारे ४ कोटींची फसवणूक झाली.

तपास पूर्ण झाल्यावर सर्व पैसे खात्यात परत जमा होतील, असे आश्वासन भामट्यांनी दिले होते. मात्र ७ नोव्हेंबर उलटूनही पैसे परत न आल्याने आणि भामट्यांचा संपर्क तुटल्याने तलवार यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी गौतम बुद्ध नगरच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यात धाव घेतली. ११ नोव्हेंबर रोजी तलवार पुन्हा न्यूयॉर्कला परतले असून तिथे त्यांनी अमेरिकेची तपास यंत्रणा ‘एफबीआय’कडेही तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सायबर सुरक्षा विभागाच्या डीसीपी शैव्या गोयल यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही