प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: अभिनेता संजय दत्तने १९९३ च्या शस्त्रास्त्र प्रकरणावर नुकताच मोठा खुलासा केला आहे. ‘शेखर टुनाइट’ या शेखर सुमन यांच्या शोमध्ये बोलताना त्याने त्या वेळी घरात बेकायदेशीर शस्त्रे ठेवण्याच्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. ‘ती चूक माझीच होती’, अशी कबुली देत त्याने या घटनेबाबत आजही पश्चात्ताप होत असल्याचे स्पष्ट केले.
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांनंतर संजयच्या घरी शस्त्रे सापडल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या घटनेची आठवण सांगताना त्याने (Sanjay Dutt) मान्य केले की, तेव्हा आपल्या मनातील इशाऱ्याकडे त्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. शस्त्रे ठेवणे योग्य नसल्याची जाणीव मनाला होत होती, पण केवळ एका आठवड्यासाठी ती ठेवली तर काय नुकसान होणार, असा विचार करून त्याने तो निर्णय घेतला. मात्र या एका चुकीचे परिणाम इतके गंभीर होतील याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती, असेही तो म्हणाला.
कोणताही निर्णय घेताना स्वतःच्या मनाचा आवाज ऐकणे गरजेचे असते, तसेच आपण ज्या देशात राहतो तिथल्या कायद्यांची माहिती प्रत्येकाला असायला हवी, असे संजयने सांगितले. या मुलाखतीत त्याने वडील सुनील दत्त यांच्याबद्दलची एक भावनिक आठवणही उलगडली. पोलिसांनी जेव्हा अटक करून बेड्या घातल्या, तेव्हा वडिलांना मोठा धक्का बसला होता आणि त्यांना अश्रू अनावर झाले होते. ते पाहून अत्यंत वेदना झाल्या, मात्र स्वतःच्या भावना बाजूला ठेवून ही कारवाई प्रक्रियेचाच भाग असल्याचे सांगत वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.
मुंबई बॉम्बस्फोटांच्या तपासादरम्यान समोर आलेल्या या प्रकरणात संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. मात्र, दहशतवादाच्या आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा पाच वर्षांपर्यंत कमी केली. उर्वरित शिक्षा पूर्ण करून फेब्रुवारी २०१६ मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला. कायदेशीर संघर्ष आणि तुरुंगवासानंतर संजय पुन्हा चित्रपटसृष्टीत सक्रिय झाला असून सध्या तो विविध चित्रपटांमधून काम करत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमरावती हादरलं! आई खोटं बोलत असल्याच्या संतापातून इंजिनिअर मुलाने घेतला जन्मदातीचा बळी
- इंडिया ‘अ’ चा ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी दणदणीत विजय, मुंबईकर सुर्यांश शेडगेची दमदार खेळी
- सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फेटाळली इंडिया आघाडीची भेटीची विनंती; विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









