Sambhaji Bhide: दहीहंडीच्या मंचावर गौतमी पाटील आणि राधा पाटील यांसारख्या नृत्यांगनांना नाचवल्यावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदूंच्या सणांमध्ये अशा प्रकारे महिलांना नाचवणं म्हणजे संस्कृतीचा अपमान असून, हे कृत्य करणाऱ्या आयोजकांना त्यांनी थेट ‘देशद्रोही’ ठरवलं आहे. त्यामुळे सध्या सण-उत्सवांतील बदलत्या स्वरूपावरून राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
केवळ नृत्यांगनांच्या सहभागावरच नाही, तर उत्सवांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या डीजे आणि डॉल्बीवरही भिडेंनी सडकून टीका केली आहे. हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजवण्याची कोणतीही गरज नसून, संपूर्ण देशाने ही संस्कृती फेकून दिली पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं आहे. डॉल्बीच्या दणदणाटातून नेमकं काय साध्य होतं, असा उद्विग्न सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उत्सवातील या नव्या ट्रेंडवर टीका केली होती, त्याला आता भिडेंच्या विधानामुळे आणखी बळ मिळालं आहे.
Sambhaji Bhide angry on Gautami Patil dance
राज ठाकरेंचाही डीजेला विरोध; लेझर लाईट आणि डॉल्बीमुळे जिवाचा धोका
डीजे आणि डॉल्बीची ही संस्कृती मूळची उत्तर प्रदेश आणि बिहारची असून ती जाणीवपूर्वक महाराष्ट्रात आणली जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. गोविंदाच्या वेळी मंचावर महिलांना आणून नाचवणं, लेझर लाईट्सचा डोळ्यांवर होणारा घातक परिणाम आणि डॉल्बीच्या आवाजाने हृदयविकाराच्या रुग्णांना जाणवणारा धोका, यावर त्यांनी लक्ष वेधलं होतं. आपण सणांच्या नावाखाली धर्मांध होत चाललो आहोत आणि हे सगळं आपल्याला खड्ड्यातच घेऊन जाईल, असा इशाराही राज यांनी दिला होता.
सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीबंदीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. पुण्यात ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यानंतर हा वाद राज्यभर पसरला. वाढतं ध्वनीप्रदूषण, रुग्ण, लहान मुले आणि वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर, परभणी, लातूरसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने स्थानिक पातळीवर डीजेवर कडक निर्बंध घातले आहेत.
दुसरीकडे, काही मंडळं आणि आयोजक सरसकट बंदीला विरोध करत असून, आवाजाची मर्यादा निश्चित करून परवानगी देण्याची मागणी करत आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या ध्वनीप्रदूषणाची गंभीर दखल घेत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अहवाल मागितला आहे. थोडक्यात सांगायचं तर, सध्या राज्यात ‘धार्मिक उत्साह विरुद्ध ध्वनीप्रदूषण’ असा एक नवा राजकीय आणि सामाजिक संघर्ष उभा राहिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पंजाबराव डखांचा पावसाचा नवा अंदाज! राज्यात ‘या’ तारखेपासून मुसळधार, बळीराजाला मोठा दिलासा
- Old Monk Ban in Maharashtra: ‘ओल्ड मॉन्क’वरील बंदी तूर्तास कायम? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- ‘डीजे-डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही’, साताऱ्याच्या एसपींचा मोठा गौप्यस्फोट; नेमकं कारण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











