बुलढाणा, 14 नोव्हेंबर: शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशन कसे चालते ते पाहू, असा गंभीर इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनी दिला आहे. सरकारच्या नरडीवर पाय ठेवून आपण शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज ‘दुष्काळ संघर्ष यात्रा’ काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून या यात्रेला सुरुवात झाली असून, एका शहीद जवानाच्या वीरपत्नीच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. ही संघर्ष यात्रा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांचा दौरा करून बुलढाणा शहरात पोहोचणार आहे.
यावेळी सरकारवर सडकून टीका करताना तुपकर म्हणाले की, शेतकरी आणि सैनिकांमुळेच हा देश जिवंत आहे. मात्र, आज देशाचा जवान आणि जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी दोघेही आतल्या आत गुदमरत आहेत. दुष्काळ येणार आहे हे सरकारला वर्षभरापासून माहीत होते, मग शेतकऱ्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर का आणून ठेवले? असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.
रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या या दुष्काळ संघर्ष यात्रेमुळे, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना विराटची आठवण आली; आर. अश्विनची मोठी कबुली
- गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांनी मते चोरली; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप
- सूर्यकुमार यादवचं दणदणीत कमबॅक! १५ चेंडूत अर्धशतक झळकावत श्रेयस अय्यरला दिला धोक्याचा इशारा








