प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: आम आदमी पार्टीने (Punjab Election 2027) पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्व विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, तर सध्या तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे.
या पहिल्या यादीत अर्थमंत्री हरपाल चीमा यांना स्थान देण्यात आलेले नाही. संगरूरमधील तुरबंजरा येथील गुलजार आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते. मात्र, त्यांच्या जागेवरून अद्याप कोणत्याही नवीन उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. पंजाब विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ मार्च २०२७ मध्ये संपत असून, एकूण ११७ पैकी ९४ जागांवर सध्या ‘आप’चे आमदार आहेत.
या यादीत चार माजी मंत्र्यांना त्यांच्या जुन्याच मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यापैकी ब्रह्म शंकर शर्मा जिम्पा यांना होशियारपूरमधून तिकीट मिळाले आहे. ते १६ मार्च २०२२ रोजी मंत्री बनले होते व त्यांच्याकडे महसूल, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता ही खाती होती. २३ सप्टेंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना हटवण्यात आले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संसदीय कामकाज खाते सांभाळणाऱ्या डॉ. इंदरबीर सिंग निज्जर यांना अमृतसर दक्षिणमधून उमेदवारी मिळाली आहे. मार्च २०२२ मध्ये मंत्रिमंडळात सामील झालेल्या निज्जर यांनी वैयक्तिक कारणास्तव मे २०२३ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि संसदीय कामकाज विभागाची जबाबदारी सांभाळलेले बलकार सिंग यांना कर्तारपूरमधून पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. ते मे २०२३ मध्ये मंत्री बनले होते, मात्र २३ सप्टेंबर २०२४ च्या फेरबदलात त्यांना पदावरून हटवण्यात आले. कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास तसेच नंतर अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री राहिलेले कुलदीप सिंग धालीवाल यांना अजनालामधून उमेदवारी मिळाली आहे. ते १९ मार्च २०२२ रोजी मंत्री बनले होते आणि ३ जुलै २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना पदावरून दूर करण्यात आले.
‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांतील विकासकामांमुळे पंजाबची जनता आनंदी असून भगवंत मान यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आणि शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी तळागाळात केलेल्या कामांमुळे राज्यात सकारात्मक वातावरण असल्याचे ते म्हणाले. भगवंत मान यांचे काम, त्यांचे पंजाबवरील प्रेम आणि राज्याची प्रगती यावर पक्ष निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुरुंगात असलेले उमेदवार संजीव अरोरा यांच्याबद्दल बोलताना सिसोदिया म्हणाले की, भाजप सध्या केवळ आरोप करून निवडणुका लढवत आहे. अरोरा हे पंजाबमध्ये गुंतवणूक आणण्याचे मोठे काम करत होते, मात्र त्याची धास्ती घेऊन भाजपने त्यांना एका खोट्या प्रकरणात अटक केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- रवींद्र धंगेकरांची नवनाथ बन यांच्यावर वादग्रस्त पोस्ट; ‘कधी तुझी नसबंदी होईल…’, महायुतीत शाब्दिक वाद शिगेला
- शाह, योगी नव्हे, पुढचा पंतप्रधान या राज्यातून? उपराष्ट्रपतींच्या थेट विधानाने मोठी खळबळ
- लाडक्या बहिणींची दिवाळी गोड; सणासुदीच्या तोंडावर सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








