प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठी शंका उपस्थित केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याऐवजी त्यातून तिसराच गट निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे विधान शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या विलिनीकरणाच्या चर्चेला एक नवे वळण मिळाले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच या विलिनीकरणाच्या चर्चांना हवा दिली होती. आज तटकरे पुण्यात असून ते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान विलिनीकरणाच्या मुद्द्यावर खलबते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच शिरसाट यांनी तिसऱ्या गटाची शक्यता वर्तवल्याने राष्ट्रवादीत नेमके काय घडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीतील सद्यस्थितीवर सडेतोड भाष्य केले. दोन्ही गटांमध्ये अंतर्गत कुस्ती सुरू असल्याचे सांगत ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरुवातच एकमेकांचे कपडे फाडण्याने होत असेल, तर विलिनीकरण होईल असे वाटत नाही. सकाळी विलिनीकरणाची चर्चा होते आणि दुपारी हेच नेते एकमेकांवर आरोप करतात. त्यामुळे नेमका अंदाज बांधणे कठीण झाले असून, यातूनच दोन्ही राष्ट्रवादींचा मिळून तिसरा गट तयार होईल अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शिरसाट यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. हा कायदेशीर पेच सुटेपर्यंत दोन्ही गटांचे समाधान होणार नाही आणि दोन्ही बाजूंनी न्यायालयात आपली बाजू मांडल्याचे ते म्हणाले. ‘अमोल’च्या दावणीला गोकुळ दूध संघ बांधण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी ५ लाख शेतकऱ्यांचा संघ असलेले गोकुळ हे महाराष्ट्राचे वैभव असल्याचे नमूद केले. गोकुळ कुठेही जाणार नाही, हा चुकीचा प्रचार थांबवावा; असे काही घडलेच तर आम्ही तुमच्या सोबत उभे राहू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. तसेच, संजय राऊत यांच्या गोकुळबाबतच्या प्रतिक्रियेवर बोलताना त्यांनी राऊतांच्या सरकारच्या काळातही असे निर्णय घेण्यात आल्याची आठवण करून दिली.
📌 महत्वाच्या बातम्या
- ४८ तास कोठडीत राहिल्यास सरकारी कर्मचारी आपोआप निलंबित; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- मनोज जरांगेंकडून अमृता फडणवीस, सुनेत्रा पवारांना भाऊबीजेची भेट; वक्तव्याची जोरदार चर्चा
- रामदास कदम यांच्या आरोपांवर सुनील तटकरे यांचा सणसणीत टोला; एका ओळीतच लावला निकाल
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








