Medhavi Bidhuri: सोशल मीडियावर रातोरात कोण स्टार होईल, याचा काही नेम नाही. महिला दिल्ली प्रीमियर लीगमध्ये (WDPL) सध्या एका अनोख्या ‘6-7’ विकेट सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, या सेलिब्रेशनने धुमाकूळ घातलेल्या महिला गोलंदाजाने आता चक्क टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीकडे एक खास वैयक्तिक मागणी केलीये.
सेंट्रल दिल्ली क्वीन्सकडून खेळताना २० वर्षीय लेग-स्पिनर मेधावी बिधुरीने हे हटके सेलिब्रेशन केलं. २० ऑगस्ट रोजी झालेल्या सलामीच्या लढतीत तिने निशिका सिंगला बाद केलं. त्यानंतर केलेलं तिचं हे ‘६-७’ सेलिब्रेशन वाऱ्यासारखं व्हायरल झालं. या सामन्यात २४ धावा देऊन तिने २ बळी घेतले.
मेधावीला विराट कोहलीच्या ‘फॉलो बॅक’ची प्रतीक्षा
मेधावीच्या जर्सीचा नंबरही ६७ आहे. त्यामुळे तिचं हे सेलिब्रेशन अगदी चपखल बसलं. आता तिचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स वाढलेत. पण, तिला प्रतीक्षा आहे ती एका खास व्यक्तीच्या फॉलो बॅकची. पत्रकारांशी संवाद साधताना मेधावी म्हणाली की, “माझे आता भरपूर फॉलोअर्स झाले आहेत. पण, मला विराट कोहलीकडून फॉलो बॅक हवाय.”
विराट कोहली आणि माजी महिला भारतीय कर्णधार मिताली राज हे तिचे आदर्श आहेत. विराट दिल्लीचा असल्यामुळे तो तिचा साहजिकच आवडता खेळाडू आहे. तर, मिताली राजचा संयम तिला खूप भावतो. विशेष म्हणजे, मेधावीने मितालीसोबत अनेक सराव शिबिरांमध्ये सहभाग घेतला आहे.
दुसरीकडे, एकाच मैदानावर असूनही तिला विराटला कधीच भेटता आलेलं नाही. याबाबत खंत व्यक्त करताना ती म्हणाली, “मी डीडीसीए (DDCA) मध्ये सराव करत होते. तेव्हा विराटही तिथेच होता. पण दुर्दैवाने आमची भेट होऊ शकली नाही.”
आता मेधावीचं पुढचं लक्ष्य महिला प्रीमियर लीग (WPL) आहे. तिला कोणत्या संघात जायला आवडेल? असं विचारल्यावर तिने थेट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चं नाव घेतलं. यामागेही विराट कोहली हेच मुख्य कारण असल्याचं ती हसत हसत सांगते. याआधी २०२५ च्या DPL फायनलमध्ये साऊथ दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना तिने ३ बळी घेत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. आता तिच्या या चमकदार कामगिरीनंतर तिला डब्ल्यूपीएलमध्ये संधी मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बाहेर जेवायला जाताय? तुकाराम मुंढेंनी सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी नक्की तपासा
- पिंपरी-चिंचवडमधील २ महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह, अखेर लग्नाच्या तोंडावर मोठा निर्णय!
- तिरंगा गाऊनवरून देशात खळबळ, राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपांवर उर्वशी रौतेलाचं थेट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











