प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या संघातील स्थानाबाबतचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, ‘दैनिक जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित आणि विराट आगामी वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहेत.
बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले की, रोहित आणि विराट हे लिजंड आहेत, त्यामुळे कधीपर्यंत खेळायचे याचा निर्णय ते स्वतःच घेतील. २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला त्यांची नितांत गरज भासणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या कठीण असल्याने तिथे या दोन्ही खेळाडूंचा अनुभव संघाच्या कामी येईल, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील ४ सामन्यांमध्ये रोहित शर्माने अवघ्या ३०, तर विराट कोहलीने ८६ धावा केल्या होत्या. यात रोहित दोनदा शून्यावर बाद झाला. त्यामुळे त्यांच्या निवडीबाबत साशंकता होती. जुलै महिन्यात लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर रोहित निवृत्ती घेईल, अशीही चर्चा सुरू होती. यासोबतच निवड समितीने विराटलाही वर्ल्ड कपसाठी त्याच्या नावाचा विचार होत नसल्याचे सांगत निवृत्तीचा पर्याय दिला होता. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बीसीसीआयपर्यंत पोहोचले आणि सचिव देवजित सैकिया यांनी रोहित शर्माची बाजू घेतली. रोहितच्या बाबतीत अजित आगरकर, गौतम गंभीर आणि निवड समिती यांचा एकच विचार होता, मात्र बीसीसीआयची भूमिका वेगळी होती. बीसीसीआयने रोहित शर्माबाबत घेतलेल्या या निर्णयानंतरच अजित आगरकर यांनी आपला कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बोर्डाकडून आगरकर यांना एका वर्षाच्या मुदतवाढीची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्यांनी ती नाकारली.
आगरकर यांच्यासोबत घडलेला हा प्रकार पाहता, आता निवड समितीचा कोणताही सदस्य जोखीम पत्करायला तयार नाही. सध्या गोष्टी संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीच्या हातात राहिलेल्या नसून, बीसीसीआयला जो संदेश द्यायचा होता तो देण्यात आला आहे. दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये रोहितऐवजी यशस्वी जयस्वालला संधी द्यायची असती, तर तो निर्णय आतापर्यंत व्हायला हवा होता. वेळ पुढे गेल्यामुळे आता नव्या खेळाडूला सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पत्नीने माहेरच्यांसोबत मिळून केली होती पतीची हत्या; तब्बल सात वर्षांनंतर न्यायालयाने सुनावली जन्मठेप
- राज्याच्या प्रशासनात मोठे बदल होणार? नव्या मुख्य सचिवपदासाठी ३ नावांची जोरदार चर्चा
- यशस्वी जैस्वालला ट्रेड करण्यासाठी ४ फ्रँचायझींमध्ये चुरस; राजस्थान रॉयल्सकडून चाचपणी सुरू








