पत्नीने माहेरच्यांसोबत मिळून केली होती पतीची हत्या; तब्बल सात वर्षांनंतर न्यायालयाने सुनावली जन्मठेप

पत्नी नांदायला येत नसल्याच्या वादातून पतीने शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून पत्नी आणि तिच्या माहेरच्यांनी पतीची हत्या केली होती. याप्रकरणी पाच जणांना जन्मठेप.

Published On: 

Violent clash between two groups in Majalgaon Beed

पुणे, 21 नोव्हेंबर: पत्नी नांदायला येत नसल्याच्या वादातून पतीची हत्या केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने पत्नीसह तिच्या माहेरच्या पाच जणांना जन्मठेप आणि साडेआठ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. जानेवारी २०१९ मध्ये घडलेल्या या घटनेचा निकाल तब्बल सात वर्षांनंतर लागला असून, साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा निर्णय दिला.

कौटुंबिक वादातून पत्नी नांदण्यासाठी येत नसल्याने विनोद भगत यांनी रागाच्या भरात तिला शिवीगाळ केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून पत्नी नंदा भगत हिने आपल्या माहेरच्या लोकांसोबत विनोद यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात कुऱ्हाड, बरशी, लोखंडी गज आणि काठ्यांचा वापर करण्यात आला होता. या मारहाणीत विनोद भगत यांचा मृत्यू झाला, तर त्यांची आई, भाऊ आणि भावजय जखमी झाले होते.

या खून प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्या न्यायालयाने नंदा भगत (पत्नी), जयसिंग चिव्हे (सासरा), विमल चिव्हे (सासू), तसेच सचिन चिव्हे आणि पांडुरंग ऊर्फ पांडू चिव्हे (दोघे मेहुणे) (सर्व रा. चिव्हेवाडी, ता. पुरंदर) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, या प्रकरणातील आणखी एक आरोपी लता चिव्हे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

बचाव पक्षाने साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतीवर बोट ठेवले होते, मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायमूर्तींनी निकालात नोंदवले की, सर्व साक्षीदार ग्रामीण आणि डोंगराळ भागात राहणारे शेतमजूर आहेत. त्यांना न्यायालयीन कामकाजाची माहिती नाही. अनेक महिने बोलावूनही त्यांची साक्ष नोंदवली गेली नव्हती आणि मुंबईहून पुण्याला आल्यावरही उलटतपासणीसाठी त्यांना तासन्‌तास वाट पाहावी लागली. अशा परिस्थितीत त्यांच्या साक्षीत काही विसंगती आढळणे स्वाभाविक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सांगितले की, या प्राणघातक हल्ल्यानंतर आरोपींच्या धास्तीने मृताच्या मुलासह कुटुंबाला गाव सोडून जावे लागले होते. सात-आठ वर्षे उलटूनही उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवर हा गुन्हा सिद्ध करण्यात सरकार पक्षाला यश आले. या न्यायालयीन कामकाजात सहायक पोलीस उपनिरीक्षक जयसिंग जाधव, पैरवी अंमलदार विद्याधर निचित आणि जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी माधुरी तावरे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही