प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील बहुचर्चित ‘सँडपेपर गेट’ प्रकरण उस्मान ख्वाजाच्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. या प्रकरणी आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने उडी घेत, “कुणीतरी खोटं बोलत आहे,” असे परखड मत व्यक्त केले आहे.
उस्मान ख्वाजाने त्याच्या ‘सब्र’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वी एक मोठा खुलासा केला. २०१८ साली दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकाराची माहिती केवळ स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या तीनच खेळाडूंना नव्हती, तर गोलंदाजांसह संपूर्ण संघाला याची कल्पना होती, असा दावा ख्वाजाने केला आहे. या प्रकरणातील दोषी खेळाडूंपैकी एक असलेल्या कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टने नुकतेच ४००० शब्दांचे एक निवेदन प्रसिद्ध करत विद्यमान कर्णधार पॅट कमिन्सवरही निशाणा साधला आहे.
या संपूर्ण गदारोळात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. २०१८ च्या घटनेवेळी उपस्थित असलेले खेळाडू आणि कोचिंग स्टाफ आपले मत मांडू शकतात, परंतु या प्रकरणाची नव्याने कोणतीही चौकशी केली जाणार नाही, असे बोर्डाने म्हटले आहे.
‘बियॉन्ड२३ क्रिकेट पॉडकास्ट’वर (Beyond23 Cricket Podcast) बोलताना मायकल क्लार्कने यावर मत मांडले. तो म्हणाला, “सध्याच्या स्थितीत उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, चॅड सायर्स आणि आता कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट हे सर्वजण सांगत आहेत की याबद्दल सर्वांना माहिती होतं. पॅट कमिन्सनेही नुकताच माध्यमांशी संवाद साधला. पण मी आत्ता कोणाचीही बाजू घेत नाहीये.”
क्लार्कला या प्रकरणात फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे. “सत्य एकच असतं, दुहेरी किंवा संमिश्र सत्य असं काही नसतं, यावर माझा विश्वास आहे. एखाद्या वकिलासारखं शब्दांवर जायचं झाल्यास मला जपून बोलावं लागेल, कारण माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा (defamation) ठरावा असं मला वाटत नाही. पण मी सत्यच सांगत आहे,” असेही तो म्हणाला.
क्लार्कच्या मते, आता मुख्य मुद्दा चेंडू कुरतडण्याचा नसून त्यानंतर करण्यात आलेल्या लपवाछपवीचा आहे. “ऑस्ट्रेलियन जनता आणि क्रिकेट चाहते आता त्या गुन्ह्यापलीकडे गेले आहेत. आता मुख्य मुद्दा तो गुन्हा नसून, त्यानंतरचे वर्तन आणि खोटेपणा हा आहे. कुणीतरी खोटं बोलत आहे. जशी माझी मुलगी माझ्याशी खोटं बोलते, तेव्हा तिला शिक्षा करण्यासाठी मला सत्य शोधून काढणं गरजेचं असतं, तसंच मला यात सत्य जाणून घ्यायचं आहे.”
दरम्यान, जगभरातील अनेक माजी क्रिकेटपटूंनीही या मुद्द्यावर मत मांडले आहे. जेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होतो, तेव्हा तो कुरतडला गेला आहे की नाही, हे वर्षानुवर्षे लाल चेंडूने खेळणाऱ्या गोलंदाजांना लगेच समजते, असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींनंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड पॅट कमिन्सवर खटला भरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डॉ. रुचिका शर्मांचे वादग्रस्त दावे; ‘९० टक्के युद्धे मराठ्यांविरुद्ध’
- ‘इस्लाई फाउंडेशन’ ते ‘शहाजी पाटील’ फेक अकाउंट; पैगंबर शेख यांच्यावर बदनामीचे आरोप, सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप
- ४००० कोटींपेक्षा जास्त कमाई करणार! ‘रामायण’ चित्रपटाबाबत अभिनेत्री लारा दत्ताचा मोठा दावा








