Share

सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्ली-मुंबईत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले

दिल्ली आणि मुंबईत आंदोलकांची धरपकड सुरू असून यावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकार गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil severely criticizes government over protesters detention in Delhi and Mumbai.

जालना, 10 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली आणि मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांची मोठी धरपकड सुरू केली आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी आणि कॉकरोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्यासह १७०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुंबईत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जालन्यातून तीव्र संताप व्यक्त करत, ‘सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत आहे,’ असा घणाघात केला आहे.

जालन्यात पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. सरकारला आपली मनमानी करायची असून लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन दादागिरीने मोडून काढायचे आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार म्हणेल त्याच पद्धतीने आंदोलन चालले पाहिजे, अशी सद्यस्थितीत सरकारची भूमिका आहे. त्यांना विद्यार्थी आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, असेही ते म्हणाले. अभिजीत दिपके यांना केलेली अटक म्हणजे सरकारचा आंदोलन चिरडून टाकण्याचाच प्रयत्न असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

‘एसआयआर’ रद्द करणे आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ‘सीजेपी’ने दिल्लीत या आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात जेन-झी आणि विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी निमलष्करी दलासह मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवत हजारो आंदोलकांना जेरबंद केले. तत्पूर्वी, काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी कालच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन ज्ञानेश कुमारांविरुद्ध निवेदन दिले होते.

दुसरीकडे, याच मागण्यांसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावरही आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी अगोदरच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. तुषार गांधी यांना अंधेरी पश्चिमेकडील डी.एन. नगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले. या कारवाईचे पडसाद उमटले असून डी.एन. नगर पोलीस ठाण्याबाहेर शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत ‘वोट चोर गद्दी छोड’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही