🕒 1 min read
विशेष प्रतिनिधी | महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बीडमधील पूजा मोरे यांच्या माघारीच्या प्रकरणावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. या एका घटनेवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणाला ‘ट्रेलर’ म्हणत थेट मराठवाड्यातील बड्या नेत्यांना टार्गेट केलंय, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांना संस्कृतीचे धडे देत सज्जड दम भरला आहे.
Laxman Hake warns Bajrang Sonwane and Rajesh Tope
लक्ष्मण हाके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत पूजा मोरेंच्या माघारीवर सडकून टीका केली. “लढण्याआधीच रडणं आणि रणांगणातून पळ काढणं, हे पाप आहे,” असा टोला हाकेंनी लगावला. मात्र, त्यांचा रोख केवळ पूजा मोरेंपुरता मर्यादित नव्हता. त्यांनी थेट नेत्यांची नावं घेत इशारा दिला की, “पूजा मोरे हा तर फक्त ट्रेलर आहे. खासदार बजरंग सोनवणे, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि राजेश टोपे यांचा पिक्चर अजून बाकी आहे. तुम्ही ओबीसी नेत्यांना आणि समाजाला सोडलं नाही, आता त्याचे परिणाम भोगावे लागतील.” हाकेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पूजा मोरेंची पाठराखण केली आहे. जुने व्हिडीओ व्हायरल करून उमेदवारांना टार्गेट करण्याच्या प्रकारावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “निवडणुकीच्या काळात जुने व्हिडीओ उकरून काढणे आणि एखाद्याला लक्ष्य करणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. असे प्रकार वेळीच थांबले नाहीत, तर त्याचे दुष्परिणाम संबंधितांना भोगावे लागतील. अन्यायाविरुद्ध आम्ही नेहमीच उभे राहू,” अशा शब्दांत जरांगेंनी विरोधकांना आणि ट्रोलर्सना प्रतिइशारा दिला आहे.
एकीकडे हाकेंनी या माघारीला ‘ओबीसींना टार्गेट केल्याचा परिणाम’ म्हटलंय, तर जरांगेंनी याला ‘विकृत ट्रोलिंग’ ठरवलंय. त्यामुळे पूजा मोरे प्रकरणावरून आता हाके विरुद्ध जरांगे असा नवा ‘कलगीतुरा’ रंगला असून, येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “पूजा मोरे हा तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी!” लक्ष्मण हाकेंचा जरांगे गटावर हल्लाबोल; बड्या नेत्यांना दिला इशारा
- मनोज जरांगेंचा ट्रोलर्सना सज्जड दम; पूजा मोरेंच्या समर्थनार्थ घेतली ‘ही’ भूमिका, म्हणाले “परिणाम भोगावे लागतील!”
- “माझ्या हातात मतं नाहीत, पण…” मनोज जरांगे पाटलांची मोठी गर्जना; महापालिका निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट!













