🕒 1 min read
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणात तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांनी कथित कट रचताना मोबाईलवर सांकेतिक शब्द (कोडवर्ड) आणि टोपणनावांचा वापर केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी डिलीट केलेला मोबाईल डेटा पुन्हा मिळवला असून, आता त्या चॅट्सचा अर्थ उलगडण्याचे काम सुरू आहे. (Pune Lohgarh Crime News)
आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात (Pune Session Court) हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, डिलीट केलेले चॅट्स सायबर तज्ज्ञांच्या मदतीने रिकव्हर करण्यात आले आहेत. या संभाषणात वापरलेले कोडवर्ड आणि टोपणनावे समजून घेण्यासाठी आरोपींची समोरासमोर चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
सियाच्या घरातून जुना मोबाईल जप्त
तपासादरम्यान, पोलिसांनी सिया गोयलच्या घरातून सुमारे एक वर्ष जुना मोबाईल फोन जप्त केला आहे. या मोबाईलमधील माहितीची तांत्रिक तपासणी सुरू आहे. या उपकरणातून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली भेट एका दिवाळी पार्टीत झाली होती. या ओळखीपासून पुढील घटनाक्रमाची साखळी उलगडण्यासाठी पोलिस या कनेक्शनचाही तपास करत आहेत.
कोडवर्ड डिकोड करण्याचे आव्हान
रिकव्हर करण्यात आलेल्या चॅट्समध्ये मोठ्या प्रमाणावर सांकेतिक शब्द आणि टोपणनावे वापरण्यात आले आहेत, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या शब्दांचा कथित कटाशी काही संबंध आहे का? हे स्पष्ट करण्यासाठी फॉरेन्सिक आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळांची पाहणी, कथित कटाशी संबंधित ठिकाणांची तपासणी, सीन रिक्रिएशन, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी, संभाव्य साक्षीदारांची चौकशी, कपडे आणि इतर वस्तू जप्त करणे तसेच आरोपींच्या हालचालींची पडताळणी अशा विविध तपासात्मक कारवाया केल्या आहेत.
पोलिसांनी कोठडीदरम्यान काय केले?
१) कट कुठे रचला, याची संबंधित ठिकाणी आरोपींना नेत तपासणी करण्यात आली.
२) हत्येचा सराव पुण्यातील लुल्लानगर येथील टेकडीवर झाला. तेथे सियाला घेऊन पोलिसांनी सरावस्थळाची पाहणी केली.
३) डिलीट डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले.
४) गुन्ह्यानंतर कुणाशी चर्चा केली, याबाबत चौकशी करून चेतनच्या एका मित्राला ताब्यात घेण्यात आले.
५) सिया आणि चेतन यांना वेगवेगळे लोहगडावर नेत घटनेचे सीन रिक्रिएशन करण्यात आले. यावेळी चेतनचे गेट अॅनालिसिस करून सबळ पुरावा मिळवला.
६) लोहगडावरील सीसीटीव्हींची तपासणी करून एकमेकांना कसे खुणावले, याची चौकशी करण्यात आली.
७) १८ जूनपूर्वीही ३१ मे, ४ जून आणि १४ जूनला केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता का, याची घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यात आली.
८) पुणे-मुंबई महामार्गावरील फूड मॉलमध्ये जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न केला.
९) नवे काही साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा असून, त्यांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली.
१०) हत्येपूर्वी सिया आणि चेतन यांनी किती वेळा लोहगडाची रेकी केली? या कटासाठी ते एकमेकांना किती वेळा भेटले? याची चौकशी करण्यात आली.
११) हत्येच्या कटात आणखी कोण सहभागी आहे का? याची दोघांकडे चौकशी करण्यात आली.
१२) हत्येच्या दिवशी सियाने घातलेले कपडे, बूट, बॅग तसेच चेतनची हुडी, पॅन्ट जप्त करण्यात आली.
📌 महत्वाच्या बातम्या
- SIR मोहिमेत निष्काळजीपणा भोवला; सोलापुरात बीएलओवर गुन्हा
- Pandharpur Wari 2026 : आषाढी वारीपूर्वी शिंदेंचा मोठा निर्णय; मंत्र्यांना तातडीच्या सूचना
- राम मंदिर ट्रस्टवर गुन्हा दाखल करा; संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












