Share

करमाळ्यात दुष्काळसदृश स्थितीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; खिशात सापडलेल्या चिठ्ठीत मांडली व्यथा

करमाळा तालुक्यातील करंजे येथे दुष्काळ आणि नापिकीमुळे संतोष लावंड या ५० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, खिशात चिठ्ठी सापडली आहे.

Published On: 

farmer suicide in karmala due to drought

सोलापूर, 10 ऑक्टोबर: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या करंजे येथे दुष्काळसदृश परिस्थितीला कंटाळून एका शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष सिताराम लावंड (वय ५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दुष्काळाच्या पहिल्याच फटक्यात अल्पभूधारक शेतकऱ्याने उचललेले हे पाऊल महाराष्ट्रातील पहिला बळी असल्याचे म्हटले जात आहे. मृत्यूआधी संतोष लावंड यांनी पॅन्टच्या खिशात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यामध्ये त्यांनी आत्महत्या करण्यामागील विदारक दुष्काळी परिस्थितीचे कथन केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संतोष लावंड हे करंजे येथील रहिवासी व अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर फक्त एक एकर शेती होती. यंदा पडलेल्या कडक दुष्काळामुळे त्यांचे पीक आणि पाणी वाया गेले. पावसाअभावी शेतात लावलेले पीक न आल्याने आणि वेळेत मदत न मिळाल्याने ते नैराश्यातून जात होते. याच नैराश्यात वाढ झाल्यामुळे त्यांनी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आयुष्य संपवले. शेतात पीक व उत्पन्न नसल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. तसेच आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी लिहिले असून पोलिसांनी या चिठ्ठीला दुजोरा दिला आहे.

संतोष लावंड यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मदतीची गरज होती. मात्र, शासनाच्या वेळकाढूपणामुळे त्यांना आर्थिक मदत मिळू शकली नाही, असा आरोप केला जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठे भाऊ भाऊसाहेब लावंड असा परिवार आहे.

या घटनेनंतर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात संतोष लावंड यांचे शवविच्छेदन करण्यात आले व त्यांच्यावर मूळ गावी करंजे येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हवालदार अशपाक शेख या प्रकरणाचा प्राथमिक तपास करत असून, पोलीस हवालदार भाऊराव शेळके हे पंचनामा व चिठ्ठीतील हस्तलिखिताचा तपास करत आहेत.

करमाळा तालुक्यात सीना नदीकाठच्या क्षेत्रातील करंजे गाव व परिसरामध्ये गेल्या वर्षी सलग तीन वेळा महापूर आला होता. मात्र, यंदा नियोजनाअभावी येथे प्रचंड दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. या भागात अलनिनोचे भाकीत खरे ठरले असून खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. यंदा या भागात मानवासह पशुपक्ष्यांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य परिस्थितीच्या धोक्याबाबत शासनाने सतर्कता दाखवली नसल्याचे मत मांडले जात आहे. दुष्काळाचे गांभीर्य पाहता शासनाने कागदोपत्रांची कार्यवाही आणि फार्स न करता, थेट शेती पाहून शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही