प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी १९ वर्षांखालील आशिया चषक २०२६ स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची शुक्रवारी (३० ऑक्टोबर) घोषणा केली. ५ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमानमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी लक्ष्य रायचंदानीकडे कर्णधारपद, तर यशवर्धन सिंग चौहानकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांची मुले, अनुक्रमे आर्यवीर आणि अन्वय यांची निवड हे या संघाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.
आर्यवीर सेहवाग हा दिल्लीचा उजव्या हाताचा आघाडीचा फलंदाज असून तो अधूनमधून लेग-स्पिन गोलंदाजीही करतो. त्याने याच वर्षी इंडिया अंडर-१९ मध्ये पदार्पण केले होते. अलीकडेच २०२६ च्या विनू मांकड ट्रॉफीमध्ये चंदीगढविरुद्ध त्याने १४३ चेंडूत १७३ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. दुसरीकडे, कर्नाटककडून खेळणाऱ्या अन्वय द्रविडने याच स्पर्धेत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून शानदार कामगिरी करत ५ डावांत ३५८ धावा कुटल्या होत्या.
संघाचे नेतृत्व करणारा १८ वर्षीय लक्ष्य रायचंदानी हा एक प्रतिभावान सलामीवीर आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करत असलेल्या लक्ष्यने यापूर्वी युथ टेस्ट, यंग वनडे आणि रणजी ट्रॉफीचे सामनेही खेळले आहेत. आशिया चषकात कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी त्याच्याकडे असेल.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “ज्युनिअर क्रिकेट समितीने ५ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमानमधील मस्कत येथे होणाऱ्या आगामी एसीसी पुरुष १९ वर्षांखालील आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. भारताला यूएई, नेपाळ आणि पाकिस्तानसह अ गटात ठेवण्यात आले आहे. अ आणि ब गटातील (बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मलेशिया) दोन संघ १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील. अंतिम सामना शनिवारी, १४ नोव्हेंबरला होईल.”
भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ६ नोव्हेंबरला नेपाळविरुद्धच्या सामन्याने करेल. त्यानंतर ८ नोव्हेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी ब्लॉकबस्टर लढत होईल, तर १० नोव्हेंबरला अ गटातील शेवटचा सामना संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध (युएई) खेळवला जाईल. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत धडक मारतील आणि १४ नोव्हेंबरला अंतिम फेरीचा थरार रंगेल.
आशिया चषक २०२६ साठी भारतीय संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, यशवर्धन सिंग चौहान (उपकर्णधार), कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनल चौहान, अन्वय द्रविड (यष्टिरक्षक), रजत बघेल (यष्टिरक्षक), व्ही. यशवीर, आर्यन सावसानी, मोहित उलवा, काव्य पटेल, शाविन विनोद, ईशान सूद.
📌 महत्वाच्या बातम्या
- स्मृती मंधानाचा खुलासा: वर्ल्ड कप विजयानंतर धोनीने पाठवला होता खास व्हॉट्सॲप मेसेज
- शेतकऱ्यांबाबतच्या विधानावरून एकनाथ शिंदे संतापले; आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
- “तुझी लायकी किती तू बोलतो किती!” नवनाथ बन यांच्या आरोपांनंतर निलेश राणे आक्रमक; महायुतीत वाद
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








