Share

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी आक्रमक; ३० सप्टेंबरला दिल्लीत बोलावली बैठक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग आणण्याच्या तयारीत ‘इंडिया’ आघाडी असून, पुढील रणनीतीसाठी ३० सप्टेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे.

Published On: 

Election Commission of India headquarters with inset of CEC Gyanesh Kumar.

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली ‘इंडिया’ आघाडीने सुरू केल्या आहेत. या प्रस्तावावर खासदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी आघाडीने ३० सप्टेंबरला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (SIR) आयोगात मतभेद असून, उर्वरित दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत १४ वेळा आपल्या हरकती नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. या खुलाशांनंतर विरोधकांनी आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि माकपचे (CPI-M) सरचिटणीस एम. ए. बेबी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतरच रणनीती ठरवण्यासाठी या तातडीच्या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली.

३० सप्टेंबरच्या बैठकीत संसदेत पदच्युतीचा प्रस्ताव आणणे, राजीनाम्यासाठी दबाव वाढवणे आणि आगामी विधानसभा निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब व उत्तराखंडमध्ये देशव्यापी आंदोलनाची रणनीती आखणे या तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मात्र, काँग्रेसने तमिळनाडूत विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाला पाठिंबा दिल्याने द्रमुक (DMK) या बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दुसरीकडे, डाव्या पक्षांनी २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही शुक्रवारी विविध राज्यांत निदर्शने केली. ‘आपल्या लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थेसमोर यापूर्वी कधीही एवढे मोठे संकट आले नव्हते,’ अशी प्रतिक्रिया भाकप (माले) लिबरेशनचे नेते दीपंकर भट्टाचार्य यांनी दिली आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपाने विरोधकांचे आरोप फेटाळले असून, पराभवाच्या भीतीतून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक अशी आंदोलने करत असल्याचा पलटवार केला आहे. निवडणूक आयोगानेही यावर स्पष्टीकरण दिले असून, ‘संस्थात्मक चर्चेदरम्यान वेगवेगळी मते असणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. आयोगाचे सर्व निर्णय वैधानिक प्रक्रियेनुसार व तिन्ही आयुक्तांच्या सर्वसंमतीनेच घेण्यात आले आहेत,’ असे आयोगाने म्हटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यासाठी, खासदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीने नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये ही बैठक बोलावली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही