प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका आता अधिक वेगाने आणि कमी खर्चात पार पडणार आहेत. शुक्रवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ‘महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम २०२४’ मधील नियम ७६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने याबाबतचा प्रस्ताव मांडला होता.
या निर्णयाचा राज्यातील अनेक छोट्या सोसायट्यांना फायदा होणार आहे. ५० हून कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांमधील निवडणूक प्रक्रिया आता विशेष सर्वसाधारण सभा जाहीर करून केवळ ९ ते १५ दिवसांत पूर्ण केली जाऊ शकेल.
याआधी २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्यांमध्येही निवडणूक अधिकारी येऊन निवडणुकीचा कार्यक्रम लावत असत. ही संपूर्ण प्रक्रिया चालण्यासाठी सुमारे ३५ दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे कमी सदस्य संख्या असलेल्या संस्थांनाही या प्रदीर्घ प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. नव्या नियमामुळे उमेदवार एकत्र करणे, निवडणूक अधिकारी नेमणे किंवा विरोधाच्या वेळी येणारा ताण, खर्च आणि वेळ वाचणार आहे.
नव्या प्रक्रियेनुसार, सोसायटीला निवडणूक घ्यायची असल्यास आधी मतदानाची यादी जाहीर करावी लागेल आणि त्यानंतर ७ किंवा १५ दिवसांत विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे लागेल. या सभेची नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जारी केली जाईल.
ही विशेष सर्वसाधारण सभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडेल आणि याच सभेत निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. निकाल घोषित झाल्यापासून दोन दिवसांच्या आत अधिकाऱ्यांनी आपला अहवाल निबंधकांकडे सादर करणे बंधनकारक आहे. निबंधकांना हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पुढील सात दिवसांमध्ये सोसायटीमध्ये नवीन समिती स्थापन होईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्ध १३६ धावांच्या खेळीनंतर दिनेश कार्तिककडून केएल राहुलचे कौतुक; दिग्गज सलामीवीरांच्या पंक्तीत दिले स्थान
- सलमान खानने मागितली श्रद्धा कपूरची जाहीर माफी; बॉक्स ऑफिसवरील क्लॅश ठरले कारण
- लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय संघर्ष; अमित देशमुख आणि भाजपच्या नवनाथ बन यांच्यात आरोप-प्रत्यारोप








