Honest Auto Driver: आजच्या काळात रस्त्यावर पडलेला एक रुपया सापडला तरी कुणी परत करेल का? तसे थोडे कठीणच. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रिक्षाचालकाने माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे असे उदाहरण समोर ठेवले आहे जे ऐकून तुम्हीही सलाम ठोकाल.
रिक्षामध्ये विसरलेली साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, २६ हजारांची रोकड आणि इतर साहित्याने भरलेली बॅग या रिक्षाचालकाने सुरक्षितपणे परत केली आहे. राजू रघुनाथ जाधव (रा. शिवाजीनगर) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांच्या या कृतीमुळे सध्या सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
राजू जाधव यांचा आदर्श आणि पोलिसांची तत्परता
३० ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील सोमनाथ बोरगाव (ता. अंबाजोगाई) येथील रहिवासी दैवशाला भगवानराव ठोंबरे या बाबापंप येथून सिडको बसस्थानकाकडे राजू जाधव यांच्या रिक्षामधून (एम.एच. २० ईके २९९५) प्रवास करत होत्या. घाईगडबडीत त्या त्यांची बॅग रिक्षातच विसरल्या. बॅगेत साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, २६,५०० रुपयांची रोख रक्कम, कपडे आणि इतर साहित्य होते. आजच्या बाजारभावाचा विचार केला तर हा सर्व ऐवज जवळपास पावणेतीन लाखांच्या घरात जातो. आपली इतकी मोठी पुंजी हरवल्याचे लक्षात येताच दैवशाला यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) के. एस. लहाने यांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली आणि अत्यंत शिताफीने रिक्षाचा शोध घेतला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे महिला प्रवाशांचा सुरक्षिततेबाबतचा विश्वास नक्कीच वाढला आहे.
दुसरीकडे राजू जाधव यांनीही बॅग पाहिल्यानंतर पावणेतीन लाखांच्या ऐवजाचा कोणताही मोह न ठेवता ती प्रामाणिकपणे सुरक्षित ठेवली होती. पोलिसांनी संपर्क साधताच त्यांनी बॅग आणि त्यातील सर्व साहित्य जसेच्या तसे पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रामाणिकपणाची दखल घेत ३१ ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात राजू जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते त्यांना ‘प्रशंसापत्र’ देण्यात आले. सत्कार समारंभाला पोलीस निरीक्षक (पीआय) गणपत राहिरे, सहायक पोलीस निरीक्षक कैलास लहाने आणि एलपीसी काळे हे देखील आवर्जून उपस्थित होते. राजू जाधव यांनी दाखवून दिले की पैशांपेक्षा प्रामाणिकपणा नेहमीच मोठा असतो.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजिंक्य रहाणेची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट; नव्या इनिंगची चर्चा
- ‘गरज नसेल तर सोने खरेदी करू नका’; PM मोदींचं आवाहन
- सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना इशारा; ‘सक्रिय नसाल तर बदला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











