नाशिक, 22 नोव्हेंबर: पुण्यात प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रुपालीचा परवाना रद्द केल्यानंतर, आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई केली आहे. शहरातील ५ नामांकित हॉटेल्स आणि मिसळ हाऊसवर छापे टाकत एफडीएने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल व्यावसायिकांना दणका दिला आहे.
या मोहिमेत कॉलेज रोडवरील प्रसिद्ध ‘दुर्गा कॅफे’चे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. ग्राहकांच्या बिलावर एफएसएसएआय (FSSAI) परवाना क्रमांक नसणे तसेच मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले भागात ‘कुकिंग मीडियम’चा उल्लेख न आढळल्याने ही कारवाई झाली. तसेच, शहरातील असावरी चौकासमोरील ‘तुषार मिसळ’मध्ये अन्न साठवणुकीसाठी अपुरी जागा आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याने एफडीएने कारवाई केली.
जुना गंगापूर नाका (गंगापूर रोड) येथील ‘हॉटेल विहार’मध्ये तपासणीदरम्यान मोठी अस्वच्छता दिसून आली. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी किटक आणि इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव अधिकाऱ्यांना आढळला. याशिवाय, सातपूर एमआयडीसी परिसरातील ‘हॉटेल शामसुंदर’मध्येही अन्न साठवणूक व स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
आडगाव फाटा येथील ‘हॉटेल महाराजा काठियावाडी’मध्येही अस्वच्छतेचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा सापडली, तसेच अन्न शिजवण्याच्या ठिकाणी धूळ व किटकांचा शिरकाव रोखण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. या सर्व आस्थापनांवर अन्न सुरक्षा नियमांचे गांभीर्याने उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.








