🕒 1 min read
मुंबई – निवडणुका आल्या की काहींना अचानक मराठी माणसाचा पुळका येतो, पण सत्तेत असताना त्यांना फक्त ‘मलिदा’ दिसतो, असा अनुभव मुंबईकरांनी अनेकदा घेतलाय. आता याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे बंधूंना घेरलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ वरळीत फुटला, आणि पहिल्याच सभेत शिंदेंनी उद्धव आणि राज ठाकरेंवर (Thackeray Brothers) तोफ डागली. “मुंबई धोक्यात नाही, तर ठाकरेंचं राजकारण धोक्यात आलंय,” असा सणसणीत टोला शिंदेंनी लगावला आहे.
Eknath Shinde attacks Raj-Uddhav Thackeray
शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. “तुम्ही २५ वर्षे सत्तेत होतात, तेव्हा व्हिजन डॉक्युमेंट कुठे गेलं होतं? तुमच्या काळात फक्त स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरचं राज्य होतं. तुम्ही अंडी खाऊन झाली, आता कोंबडी कापायला निघालात,” अशा तिखट शब्दांत शिंदेंनी ठाकरेंच्या कारभारावर बोट ठेवलं. इतकंच नाही तर, “आम्हाला मुंबईला बकासुराच्या आणि भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून सोडवायचं आहे,” असं म्हणत त्यांनी आगामी लढाईची दिशा स्पष्ट केली.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आणि मराठीच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे अधिकच आक्रमक झाले. “२० वर्षांपूर्वी तुम्ही कुणासाठी वेगळे झाला होता? आता जनतेने तुमचा बँड वाजवल्यावर तुम्हाला ‘ब्रँड’ची आठवण झाली का?” असा बोचरा सवाल त्यांनी केला.
‘म’ मराठीचा की मलिद्याचा?
एकनाथ शिंदेंनी कंत्राटदारांच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. “कंत्राट देताना तुम्हाला मराठी माणूस दिसला नाही, तेव्हा तुम्हाला दिनू मोरया चालला. मराठी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पाप तुम्ही केलं. त्यामुळे तुमचा ‘म’ हा मराठीचा नाही, तर ‘मलिद्याचा’ आहे,” असा गंभीर आरोप शिंदेंनी केला.
दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीची खिल्ली उडवली. १६ तारखेला लाडक्या बहिणी आणि भावांच्या आशीर्वादाने विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मी उद्धव ठाकरेंसारखा ‘बावळा’ नाही…”; आठवलेंच्या कवितेने वरळीत पिकली खसखस, शिंदेंचाही हल्लाबोल!
- रश्मी शुक्ला निवृत्त होताच काँग्रेसचा हल्लाबोल; फोटो शेअर करत लिहिले, “सत्ताधाऱ्यांचा True Caller…!”
- “राज ठाकरेंचं अस्तित्व संपणार…”; शहाजीबापूंचं ‘ते’ भाकीत आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











