🕒 1 min read
मुंबई – राजकारणात वैर विचारांचे असते, पण मनाचे दरवाजे मात्र उघडे ठेवायचे असतात, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. रोज सकाळी भोंग्यावरून एकमेकांवर आगपाखड करणारे, एकमेकांचे वाभाडे काढणारे दोन कट्टर राजकीय शत्रू जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा काय होतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण मुंबईत आज जे घडलं, ते पाहून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. निमित्त होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आकस्मिक भेटीचं!
Eknath Shinde meets Sanjay Raut
नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा (BMC Election 2026) धुरळा उडाला असतानाच, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे दोन दिग्गज नेते आमने-सामने आले. एकनाथ शिंदे आपली मुलाखत आटोपून बाहेर पडत होते, तर संजय राऊत स्टुडिओच्या दिशेने जात होते. एरवी टीव्हीवर एकमेकांवर तुटून पडणारे हे नेते समोर आल्यावर काय होईल, याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण घडलं भलतंच!
फक्त नजरानजर झाली नाही…
दोघांनीही एकमेकांना पाहताच स्मितहास्य करत अभिवादन केले. इतकेच नाही तर, एकनाथ शिंदे यांनी थांबून संजय राऊतांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. संजय राऊत नुकतेच एका मोठ्या आजारपणातून सावरले आहेत. राऊत आजारी असताना शिंदेंनी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून चौकशी केली होती, पण आज प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांनी पुन्हा काळजी व्यक्त केली. राऊतांनीही शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस केली.
राजकीय वैर बाजूला!
शिवसेनेत पडलेली फूट, धनुष्यबाण चिन्हाचा वाद आणि रोजचे आरोप-प्रत्यारोप… या सगळ्या कटू आठवणी बाजूला सारत दोन्ही नेत्यांनी एक-दोन मिनिटं मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले. पण या ‘सुसंस्कृत’ भेटीचा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, “हेच खरं महाराष्ट्राचं राजकारण!” अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- आईशी लफडं, मुलाने ‘बिंग’ फोडलं; संतापलेल्या काकाने केला 13 वर्षीय पुतण्याचा थरारक शेवट!
- बाळा नांदगावकर ‘बडवे’, संदीप देशपांडेंनाही संपवण्याचा डाव? संतोष धुरींच्या आरोपाने मनसेत भूकंप!
- खात्यातून पैसे चोरीला गेले? आता 24 तासांत मिळतील परत; फक्त ‘हा’ एक नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












