🕒 1 min read
मुंबई, ता. १६: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची महाराष्ट्र सरकारच्या धोरणात्मक सल्लागार संस्था ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)’ च्या मानद सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, विरोधकांनी यावर खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी या नियुक्तीवरून दमानियांना टोला लगावला आहे, तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनीही उपरोधिक अभिनंदन केले आहे.
‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’
आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची प्रचिती परत आली. यावेळी एका स्वयंघोषित समाजसेविकेने आपल्या पतीला केवळ दुसऱ्यांवर आरोप करून शासनाच्या सल्लागारपदी आणले आहे.” यातून त्यांनी दमानियांना अप्रत्यक्षपणे डिवचण्याचा प्रयत्न केला.
Anish Damania Appointed to MITRA
आमदार रोहित पवार यांनीही आपल्या पोस्टमध्ये अनिश दमानिया ( Anish Damania ) यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करताना म्हटले की, “भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत, तर आता अनिश दमानिया यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे. दमानिया कुटुंबाचा हा समन्वय निश्चितच महत्त्वाचा ठरेल.”
राजकीय नेत्यांच्या या टीकेला अंजली दमानिया यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी रोहित पवारांच्या पोस्टला उत्तर देताना स्पष्ट केले की, अनिश दमानिया हे मानद सल्लागार म्हणून कोणतेही मानधन घेणार नाहीत. “अनिश, त्याच्या ऑफिसमधील तिसरा व्यक्ती आहे जो ‘एफआयसीसीआय’चा सभासद झाला. त्यामुळेच त्याला ‘मित्रा’वर मानद सल्लागार म्हणून घेतले आहे. त्याला राजकारणाशी काहीही देणेघेणे नाही. माझ्याप्रमाणेच त्यालाही देशाच्या प्रगतीत योगदान द्यायचे आहे,” असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. या नियुक्तीमध्ये काहीही लपवण्यासारखे नाही, उलट त्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंच्या ‘बंजारा-वंजारी एकच’ वक्तव्यावरून वाद; पंजाबराव चव्हाणांनी ठामपणे विरोध दर्शवला
- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत होणार
- ‘हैदराबाद गॅझेट चुकीचा असेल तर शरद पवारांचा १९९४ चा जीआरही रद्द होणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












