Anaya Bangar: आपल्याला पुन्हा कधीच क्रिकेट खेळता येणार नाही, असा विचार एखाद्या खेळाडूच्या मनात आला तर काय होईल? भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिच्या बाबतीत अगदी असंच घडलं होतं. पण आता तिने थेट परदेशात क्रिकेटच्या मैदानात नव्याने आणि दमदार कमबॅक केलं आहे.
अनायाने यावर्षी मार्च महिन्यात लिंगबदल शस्त्रक्रिया (gender-affirming surgery) केली होती. त्यानंतर आता तिला ऑस्ट्रेलियामध्ये महिलांच्या ‘कम्युनिटी क्रिकेट’मध्ये खेळण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे, अनायाने यापूर्वी मुंबईच्या अंडर-१९ संघातून सरफराज खान आणि मुशीर खान यांच्यासोबत क्रिकेटचं मैदान गाजवलं होतं.
Anaya Bangar भारतात का खेळू शकत नाही?
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार, पुरुष वयातून गेलेल्या (male puberty) व्यक्तींना महिलांच्या एलिट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळता येत नाही. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप ट्रान्सजेंडर महिलांच्या क्रिकेटबाबत कोणतंही अधिकृत धोरण ठरवलेलं नाही.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचं हे पहिलंच प्रकरण असल्याने बोर्डाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांना खेळवण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. खुद्द अनायानेही बीसीसीआयला ईमेल करून विचारणा केली होती, मात्र तिला अद्याप कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही.
त्यामुळेच, अनायाने ऑस्ट्रेलियाची वाट धरली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) तिचे वैद्यकीय अहवाल तपासून तिला कम्युनिटी क्रिकेट खेळण्याची तात्काळ मुभा दिली आहे. “मी पुन्हा क्रिकेट खेळू शकेन असं वाटलं नव्हतं. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या संधीमुळे मी खूप आनंदी आहे,” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
अर्थात, ऑस्ट्रेलियातही तिला लगेच मोठ्या लीगमध्ये खेळता येणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, मार्च २०२७ पर्यंत तिची टेस्टोस्टेरॉन पातळी १० nmol/L पेक्षा कमी असणं बंधनकारक आहे. हा निकष पार केल्यास तिला थेट ‘महिला बिग बॅश लीग’मध्ये (WBBL) खेळण्याची संधी मिळू शकते. अनायासाठी हे केवळ एक कमबॅक नाही, तर तिच्यासारख्या अनेक खेळाडूंसाठी उघडलेला हा एक आशेचा नवा किरण आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बाहेर जेवायला जाताय? तुकाराम मुंढेंनी सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी नक्की तपासा
- पिंपरी-चिंचवडमधील २ महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह, अखेर लग्नाच्या तोंडावर मोठा निर्णय!
- तिरंगा गाऊनवरून देशात खळबळ, राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपांवर उर्वशी रौतेलाचं थेट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











