आजकाल ऑनलाईन खरेदी करणं किती महागात पडू शकतं, याचा एक भयंकर अनुभव नुकताच समोर आलाय. यावेळी चक्क एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्याच नावाने सायबर भामट्यांनी थेट ग्राहकांना गंडा घातलाय.
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Aishwarya Narkar सध्या एका धक्कादायक प्रकारामुळे प्रचंड संतापल्या आहेत. त्यांनी नुकताच आपल्या अधिकृत सोशल मीडियावर एक तातडीचा व्हिडिओ शेअर करत एका मोठ्या स्कॅमचा पर्दाफाश केला आहे. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Aishwarya Narkar Scam
काही महिन्यांपूर्वीच ऐश्वर्या यांनी अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांच्यासोबत मिळून ‘थ्रेड अँड ठुमका’ हा साड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या या नव्या ब्रँडला अल्पावधीतच ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. मात्र, आता याच लोकप्रियतेचा गैरफायदा काही भामटे घेत आहेत. ऐश्वर्या यांच्या साडी ब्रँडचे हुबेहूब नाव वापरून खोट्या कमेंट्स आणि फेक नंबर्सद्वारे लोकांकडून पैसे उकळले जात असल्याचा मोठा Scam आता उघडकीस आला आहे.
या किळसवाण्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करताना ऐश्वर्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या, “आपल्या आजूबाजूला अशा चीप मेंटॅलिटीचे लोक असतात. हे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना फसू नका.” आतापर्यंत तीन-चार वेळा हा भयंकर प्रकार घडल्याचं त्यांनी उद्विग्न होत सांगितलं.
या सायबर जाळ्यातून वाचण्यासाठी त्यांनी ग्राहकांना अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणत्याही अनोळखी नंबरवर किंवा कमेंट्समध्ये रिप्लाय देणाऱ्यांना पैसे पाठवू नका. जर तुम्ही ‘थ्रेड अँड ठुमका’ला पेमेंट करत असाल, तर ते नक्की आमचंच बिझनेस अकाउंट असल्याची आधी खात्री करा. साड्यांच्या खरेदीसाठी फक्त त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम बायोमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरच संपर्क साधा, असा स्पष्ट इशारा ऐश्वर्या यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- वानखेडेवर धोनीच्या चाहत्यांचा हिरमोड; ऋतुराजनेच केला ‘तो’ सर्वात मोठा खुलासा!
- विधानसभा निवडणुका संपताच सर्वसामान्यांना मोठा शॉक; पेट्रोल-डिझेल थेट २८ रुपयांनी महागणार?
- सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी : गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण!













