प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे एनडीएमध्ये जाऊन मुख्यमंत्री होत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असा उपहासात्मक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. अवघे १० आमदार असलेल्या पक्षाला जर भाजप मुख्यमंत्रीपद देणार असेल, तर ती त्यांची दिलदारीच म्हणावी लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.
गेल्या १२ वर्षांपासून आपण मंत्री असल्याच्या सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘गेले १२ वर्षे माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करू नका. २०१४ पासून मी मंत्री होते’, असे सुप्रिया सुळे म्हणत असल्याचे आपण ऐकले असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
या वक्तव्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, ‘हे आम्हालाही फार हृदयाला लागलंय.’ शरद पवारांच्या पक्षात सध्या केवळ १० आमदार उरले असून त्याचे तीन गट पडले आहेत. तरीही या पक्षाला मुख्यमंत्रीपद देऊन महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार असेल, तर हा एक विक्रमच ठरेल, असा चिमटा त्यांनी काढला.
जर खरोखरच सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री केले जाणार असेल, तर आपण त्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहू आणि पक्षाची भूमिका मांडू, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.







