पुणे, २६ नोव्हेंबर: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात बुधवारी दुपारी १ वाजता मंदार किवळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या ५ तासांत ६ आरोपींना अटक केली आहे. ससून रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या मंदारचा पोलिसांनी गुरुवारी सकाळी पहिला जबाब नोंदवला. ‘आमच्या शुभमला तूच मारलंस ना’, अशी विचारणा करत सहा जणांच्या टोळक्याने आपल्यावर वार केल्याचे मंदारने या जबाबात म्हटले आहे.
पोलिसांनी घेतलेल्या जबाबात हल्ल्याचा थरार मंदारने उलगडला. सुरुवातीला दोघांनी त्याला शुभमच्या हत्येबाबत विचारले आणि पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र, या दोन गोळ्या मंदारला केवळ चाटून गेल्या. त्याचवेळी गाडीवर बसलेल्या एकाने, ‘याच्या डोक्यात कोयते टाका’ असे म्हटले. त्यानंतर मंदार खाली कोसळताच त्याच्यावर कोयत्याचे २० ते २५ वार करण्यात आले. यात त्याच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
हल्ला केल्यानंतर आरोपी जोराने ओरडले की, ‘शुभम दादा, आम्ही तुझ्या खुनाचा बदला घेतला आहे. आम्हीच कात्रजचे राजे आहोत.’ असे म्हणत या हल्लेखोरांनी शुभमच्या नावाने घोषणा देत हवेत कोयते फिरवले, अशी माहिती मंदारने पोलिसांना दिली आहे.
या जीवघेण्या हल्ल्याची दखल घेत पुणे पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली. अक्षय चव्हाण, बाब्या पवार, यणप्पा, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण आणि रोहन चव्हाण या ६ आरोपींना पकडण्यात आले आहे. यातील दोघांना दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टविनायक मार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकण्यात आल्या. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात न्यायालयाला उडवून देण्याची धमकी आल्याने परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. तरीही पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.







