पुणे, 21 नोव्हेंबर: पुण्यात एका युपीएससी (UPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने खासगी प्रशिक्षण संस्थेकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी विभागांकडे केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी आणि आणखी खोट्या तक्रारी न करण्यासाठी त्याने ही मागणी केली. याप्रकरणी माऊली डुचाळ या विद्यार्थ्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील नारायण पेठेत ‘श्रीराम्स आयएएस’ (Shriram’s IAS) नावाची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारी संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय दिल्लीत असून देशभरातील प्रमुख शहरांमध्ये त्यांच्या शाखा आहेत. सारथी, महाज्योती, बार्टी आणि टार्टी यांसारख्या शासकीय संस्थांमार्फत निवड झालेल्या तसेच खासगी शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्लासच्या माध्यमातून शिकवणी दिली जाते.
१ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा खंडणीचा प्रकार घडला. आरोपी माऊली डुचाळ याने संस्थेचे सहसंपर्कप्रमुख आशुतोष सिंग यांच्या मोबाइलवर व्हॉट्सॲपवरून वारंवार मेसेज केले. त्याने पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसह विविध ठिकाणी केलेल्या तक्रारींचे फोटो फिर्यादींना पाठवून धमकावण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला संस्थेने या मेसेज आणि फोनकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर आरोपीने आपण स्वतः स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असल्याचे सांगत तक्रारी मागे घेण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. संस्थेमध्ये कोणतेही चुकीचे प्रकार चालत नसल्याचे स्पष्ट करूनही, त्याने पैसे न दिल्यास आणखी खोट्या तक्रारी करून त्रास देण्याची आणि ‘बघून घेण्याची’ धमकी दिली.
अखेर या सततच्या धमक्यांनंतर संस्थेचे शाखाप्रमुख क्षितिज बर्वे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी माऊली डुचाळ याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ आणि ३५१ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्ध केएल राहुलचे शानदार शतक; सर्व विक्रम मोडत रचला नवा इतिहास
- छगन भुजबळ, वळसे पाटील आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; शरद पवारांची मात्र अनुपस्थिती
- रोहित-विराटचा वनडे वर्ल्ड कपचा मार्ग मोकळा; आगरकर प्रकरणानंतर निवड समितीने रिस्क घेणे टाळले







